

Manwat Vice President Election
मानवत : मानवत नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते डॉ. अंकुश लाड यांची तर स्वीकृत सदस्यपदी राष्ट्रवादीचे अॅड. अनिरुद्ध पांडे व प्रकाश पोरवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नगरपालिकेच्या सभागृहात नगराध्यक्षा राणी लाड यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. 9) या नियुक्तीसाठी पहिल्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वप्रथम उपनगराध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरु झाली. या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते डॉ अंकुश लाड यांचे एकमेव नाव आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मानवत पालिकेत एकूण 22 सदस्य असून दहा नगरसेवकातून एक सदस्य या प्रमाणात दोन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार होती.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 22 पैकी 16 सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे, शिवसेना-भाजप युतीचे पाच तर शिवसेना ठाकरेचा 1 सदस्य निवडून आले आहेत. यामुळे दोन्ही स्वीकृत सदस्य राष्ट्रवादीचे होणार होते. स्वीकृत सदस्यांसाठी राष्ट्रवादीकडून अॅड. अनिरुद्ध पांडे व प्रकाश पोरवाल यांनी तर विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या वतीने चितोड अब्दुल मतीन अन्सारी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
निवडीनंतर समर्थकांच्या वतीने फटाक्याची जोरदार आतषबाजीने विजयोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान, शिवसेनेचे गटनेते अॅड. विक्रमसिंह दहे यांनी तिसऱ्या उमेदवाराने अर्ज दाखल केलेला असताना देखील राष्ट्रवादीच्या 2 स्वीकृत सदस्यांच्या बिनविरोध निवडीवर आक्षेप घेतला असून याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.