

परभणी : जिंतूर-परभणी रोडवरील टाकळी कुंभकर्ण गावाजवळ सोमवारी सायंकाळी दोन मोटरसायकलींचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात झरी येथील डॉक्टरचा मृत्यू झाला तर टाकळी कुंभकर्ण येथील एकजण गंभीर जखमी झाले आहे.
डॉ.गजानन आत्माराम काळे (वय 62, रा.झरी, ता. परभणी) असे मयत डॉक्टरचे नाव आहे. तर कृष्णा नागोराव श्रीरामे (वय 40, रा. टाकळी कुंभकर्ण, ता. परभणी) हे जखमी झाले आहेत.
झरी येथील डॉ.काळे हे त्यांच्या दुचाकीवरून प्रवास करीत असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलची जोरदार धडक बसली. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून अपघात एवढा भीषण होता की डॉ.काळे यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरे मोटरसायकलस्वार कृष्णा नागोराव श्रीरामे (रा.टाकळी कुंभकर्ण, ता.परभणी) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मयत डॉ.काळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालय येथे त्यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले.