

District-wide Chakkajam movement for loan waiver
परभणी, पुढारी वृत्तसेवा: प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक माजी आ. बच्चू कडू यांनी २४ जुलै रोजी केलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या घोषणेनंतर जिल्हाभरात आज शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
शहरातील वसमत रोडवरील एमआयडीसी परिसरात विविध संघटनांच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये शेतकरी म्हणून विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी एकवटले होते. आंदोलनामध्ये कॉ. माधुरी क्षीरसागर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
पूर्णा : शहरातील पूर्णा-ताडकळस रोड टी पॉइंट कॉर्नर रस्त्यावर शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव, दिव्यांग विधवा महिलांचे मानधन या रखडलेल्या मागणीसाठी २४ जुलै गुरुवारी सकाळपासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्णा तालुका सकल शेतकरी बांधवांच्या वतीने भव्य चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी शहरातून बाहेर जाणारे आणि ग्रामीण भागातून पूर्णा शहरात येणारी वाहनांची वाहतूक बराचवेळ ठप्प झाली होती. सदर चक्काजाम आंदोलन उभारण्याकरिता मागील चार दिवसांपासून शिवहार सोनटक्के, नरेश जोगदंड, मुंजाजी जोगदंड, विष्णु बोकारे यासह शेतकरी चळवळीतील कार्यकत्यांनी तालुक्यातील गावा गावांत जाऊन बैठका घेत शेतकऱ्यांची जनजागृती केली होती. त्या अनुषंगाने चक्काजाम आंदोलनात असंख्य शेतकरी जनसागर उसळला होता.
दरम्यान, माजी मंत्री तथा दिव्यांग, निराधार, विधवा महिला व शेतकऱ्यांच्या हितार्थ अहोरात्र आंदोलन करणारे शेतकरी नेते बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी व अन्य मागण्यांबाबत गुरुवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्याची हाक दिली होती. त्यांना पाठिंबा म्हणूनही शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन करून शेतकरी कर्जमाफी करा, यासाठी सत्ताधारी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. यावेळी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविपो अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनात पोनि विलास गोबाडे यांनी मोठ्या पोलिस फौजफाट्यासह बंदोबस्त ठेवला होता. चक्काजाम आंदोलन विसर्जित करण्यात आल्यानंतर सदर मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी आंदोलनस्थळी येवून स्वीकारले.
पालम : तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसह प्रहार संघटनेशी संलग्न असलेल्या अपंग क्रांती संघटनेच्या वतीने सर्वच घटकांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या कर्जमाफीसह सर्व शेतीमालाला हमीभाव जाहीर करत त्या हमीभावाने सर्वच शेतीमाल खरेदी करण्यात यावा.
त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याचे कर्ज माफ करून शेतक-याचा सातबारा हा कर्जमुक्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी आ. बच्चू कडू यांनी जो लढा उभारलेला आहे त्या लढ्याला पाठिंबा म्हणून २४ जुलै २०२५ रोजी पालम शहरांमध्ये सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनानंतर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बळीराम इंगळे, अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष बालाजी पौळ, शिवाजीराव शिंदे, शेतकरी सूर्यभान ढगे, संतोष रोकडे, योगेश पवार, रामजी शिंदे सीताराम गुरुजी पोळ यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाथरी येथे प्रहार अपंग संघटनेच्या वतीने सेलू कॉर्नर येथील चौकात दिव्यांग, शेतकरी, कष्टकरी, मजूर, विधवा, निराधार, महिला यांनी सुमारे दोन तास चक्काजाम आंदोलन केले. मोठ्या संख्येने जमा झालेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकत्यांनी परभणी माजलगाव रस्त्यावरील तसेच सेलू पाथरी मार्गावरील वाहतूक दोन तास रोखून धरली होती. या चक्काजाम आंदोलनात प्रहार संघटनेचे देवलिंग देवडे, तालुकाध्यक्ष सुनील ढवळे, मानवत तालुकाध्यक्ष रवी बालटकर, विजय स्वामी, शंकर चव्हाण, देवानंद साळवे, फारोखी, पितळे, मेहबूब बागवान यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.