

Child kirtankar dies after falling into a well
गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा: श्रीक्षेत्र पंढरपूरला आषाढी एकादशीनिमितच्या वारीमध्ये रात्रीला किर्तने करत मृदंग वाजविण्याचे काम करणाऱ्या गोविंद विनायक शिंदे या बाल वारकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाली. ही घटना पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगाव येथे घडली.
मयत गोविंद शिंदे हा मुळचा गंगाखेड तालुक्यातील मसला गावचा रहिवाशी असून संत सोपान काका महाराज दिंडी क्र. १६ मध्ये मृदंग वाजवित रात्रीला किर्तनही करीत होता. गोविंद हा दि. ३ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्नानासाठी भंडी शेगाव येथे मुक्कामात विहिरीच्या पायर्यांवर बसलेला असताना अचानक विहिरीत पडल्याची माहिती समोर आली.
या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला ही माहिती वार्यासारखी पसरल्याने गावासह संपूर्ण दिंडीत शोककळा पसरली. मयत गोविंदचे वडील विनायक शिंदे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांनी आपल्या मुलाची मृदंग वादनातील आवड ओळखून त्याला विशेष प्रशिक्षण दिले होते. लहान वयातच गोविंद विविध दिंड्यांत मृदंग वाजविण्यासह किर्तन करण्याचे कौशल्य दाखवित होता.
त्याच्या वादनामुळे अनेक वारकरी भारावून जात असत. या अपघाती मृत्यूबाबत गोविंदचे वडील मात्र अपघात मानायला तयार नाहीत. त्यांनी या प्रकरणामागे घातपाताचा संशय व्यक्त केला असून प्रशासनाने सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली. माझा मुलगा सहजपणे विहिरीत पडू शकत नाही.
काहीतरी घडले आहे, जे दडविले जात आहे, असे विनायक शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. गोविंदचा मृतदेह मसला गावात आणून दि.४ जुलै रोजी सकाळी गोदावरी काठी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी-आजोबा, एक भाऊ असा परिवार आहे. संत सोपान काका महाराज दिंडीतील गोविंदचा सहभाग आणि त्याचा आत्मीयतेने केलेला मृदंग वादनाचा प्रवास अचानक थांबला.