

मानवत : केंद्र शासनाच्या कापूस खरेदी योजनेंतर्गत सीसीआय व खासगी व्यापाऱ्यांनी बाजार समिती माध्यमातून दि.18 डिसेंबरपर्यंत 1 लाख 66 हजार 968 क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी केली. सीसीआयकडे कापूस विक्री नोंदणीची अंतिम तारीख 31 डिसेंबर निश्चित केली. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून शेतकरी किसान ॲपवर तातडीने कापूस नोंदणी करावी, असे आवाहन सभापती पंकज आंबेगावकर व सचिव शिवनारायण सारडा यांनी केले.
तालुक्यातील एकूण 18,617 शेतकऱ्यांनी गुरुवारी किसान ॲपद्वारे सीसीआयकडे कापूस विक्रीसाठी नोंदणी केली. यापैकी 6,924 शेतकऱ्यांना नोंदणीची मंजुरी दिली. उर्वरित नोंदणी प्रक्रियाही टप्प्याटप्प्याने तपासणीअंती पूर्ण करण्यात येत आहे. आकडेवारीनुसार 18 डिसेंबरपर्यंत सीसीआयमार्फत 90 हजार 98 क्विंटल तर खासगी व्यापाऱ्यांमार्फत 76 हजार 870 क्विंटल कापसाची खरेदी झाली. हमीभावाने कापूस विक्रीसाठी सीसीआयचा पर्याय शेतकऱ्यांसाठी अधिक लाभदायक ठरत आहे.
सध्या कापसाला 7100 ते 7500 पर्यंत भाव मिळत असून अनेक शेतकरी अद्याप नोंदणीपासून वंचित आहेत. 31 डिसेंबर नोंदणीची अंतिम संधी असल्याने शेतकऱ्यांनी विलंब न करता कागदपत्रे पूर्ण करून किसान ॲपवर नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीने केले. नोंदणी न केल्यास सीसीआयमार्फत कापूस विक्रीचा लाभ मिळणार नसल्याने शेतकऱ्यांनी दखल घ्यावी, असेही सांगितले.