

Tadkals Singnapur road incident
ताडकळस : शेतातून दुचाकीवरून गावाकडे परतत असलेल्या एका तरुणाचा भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. ही घटना ताडकळस येथील माखणी पाटीजवळ शुक्रवारी (दि.११) रात्री ९.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सुखानंद मोहन सलगर (वय ३५, रा. फुलकळस, ता. पूर्णा, जि.परभणी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुखानंद हा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास फुलकळस येथून जवळच असलेल्या आपल्या शेतात गेला होता. कामे आटोपून रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून (एम.एच.२२ ए.बी ६३९७) तो गावाकडे परतत होता. यावेळी त्याच्या दुचाकीस ताडकळस - सिंगणापूर रस्त्यावरील माखणी पाटीजवळील वळणावर अपघात झाला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. परिसरातील नागरिकांनी ताडकळस पोलिसांना कळवले.
घटनास्थळाचा पंचनामा करून प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी ताडकळस पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.