

Bike Rider killed in Khadak Pati
चारठाणा: खडक पाटीजवळील एका धाब्यासमोर जालना जिल्ह्यातील दहिफळ खंदारे येथील ३४ वर्षीय युवक आपल्या मुलाला पाहण्यासाठी जांब ( बु ) येथील भागू नाईक तांडा येथे जात होता. यावेळी त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. जखमी अवस्थेत त्याला परभणी येथील रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.२९) घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, यमराज साहेबराव चव्हाण यास मुलगी झाल्याने तो दुचाकीवरून जिंतूर तालुक्यातील जांब ( बु ) येथील भागू नाईक तांडा येथे सासरवाडीत मुलीला पाहण्यासाठी जात होता. यावेळी खडक पाटी जवळील एका धाब्याजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीस जोराची धडक दिली आणि अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत यमराजला जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.
परंतु, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास पुढील उपचारासाठी परभणी येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत यमराजच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी आहे.