

BDOs take money, alleges BJP district president
परभणी, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ९ पंचायत समिर्तीमधील गटविकास अधिकारी, प्रभारी गटविकास अधिकारी शासनाच्या विविध योजनेतील लाभार्थी व शेतकऱ्यांची पैसे घेऊन लूट करीत असल्याचा आरोप करत भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. सत्तारुढ पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनीच लेटरबॉम्ब टाकल्यामुळे प्रशासनात खळबळ माजली आहे.
जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तळागाळातील गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी योजना राबवत आहेत. या योजना तालुकास्तरावर राबवत असताना पंचायत समितीची भूमिका महत्त्वाची ठरते.
जिल्ह्यातील बहुतांश पंचायत समितीत्यांमध्ये कायमस्वरूपी गटविकास अधिकारी नाहीत. मागील तीन वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवर जिल्ह्यातील पंचायत समित्यांचा कारभार सुरू आहे. कायमस्वरूपी गटविकास अधिकारी व प्रभारी गटविकास अधिकारी गोरगरीब लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळत असल्याचा आरोप भुमरे यांनी केला आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत विहिरी मंजूर करणे, ई-मस्टर काढणे, अकुशल व कुशल देयके या कामासाठी २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत लूट केली जात आहे. घरकुल लाभार्थी यांच्याकडून ही पैसे उकळले जात आहेत.
लाभार्थ्यांनी तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकारी याची दखल घेत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. पंचायत समित्यांमध्ये पैसे दिल्याशिवाय कामे होत नसून गोरगरीब व शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार दुर्दैवी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून चौकशी करावी, दोषी गटविकास अधिकाऱ्यांना निलंबित करावे, तीन वषपिक्षा जास्त कालावधी झालेल्या प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांचा पदभार काढून त्यांच्या तातडीने बदल्या कराव्यात, अशी मागणीही सुरेश भुमरे यांनी केली आहे.