

Banjara community's rally for reservation at Bori
बोरी, पुढारी वृत्तसेवा : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी जिंतूर तालुक्यात विनोद आडे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रविवारी (दि.२०) बोरीत कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल बंजारा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत बोरी तांडा, मंगरूळ तांडा तसेच परिसरातील बंजारा समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत मोर्चा काढला.
बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या प्रश्नावर ठोस निर्णय व्हावा, या मागणीसाठी आता जिंतूर तालुक्यात विनोद आडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि उपोषणाला सामाजिक पाठबळ देण्यासाठी बोरी शहर बंद ठेवण्याचा निर्णय सकल बंजारा समाजाच्या वतीने घेण्यात आला होता.
बोरी तांडा व मंगरूळ तांडा येथील सकल बंजारा समाजाच्या वतीने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत शहरातील विविध व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. नागरिकांनीही आंदोलनाच्या मागणीला पाठिंबा देत बंदमध्ये सहभाग घेतला. बोरी शहरासह परिसरात बंदमुळे बाजारपेठेतील नेहमीची वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून आले.
बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी समाजाची एकजूट असल्याचा संदेश या बंदच्या माध्यमातून देण्यात आला. दरम्यान, बोरी शहरातील व्यापारी, नागरिक तसेच सर्व समाजबांधवांनी बंदला सहकार्य करून आंदोलनाला पाठिबा दिल्याबद्दल सकल बंजारा समाजाच्या वतीने आभार व्यक्त्त करण्यात आले.
आरक्षण मागणीसाठी एकजुटीचा संदेश
एसटी आरक्षणाच्या मागणीचा प्रश्न केवळ एका व्यक्तीचा किंवा एका गावाचा नसून तो समाजाच्या भवितव्याशी संबंधित आहे. शासनाने विनोद आडे यांच्या उपोषणाची आणि आरक्षणाच्या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घ्यावी. बंजारा समाजाच्या न्याय्य मागणीसाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. एकजुटीने आवाज उठविल्यास शासनाचे लक्ष वेधता येईल. असे बंजारा नेते अंकुश राठोड यांनी सांगितले.