

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: खरीप हंगाम २०२४ ची पंचवीस टक्के अग्रीम पीक विमा नुकसान भरपाई रक्कम आज (दि. १०) पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पूर्णा तालुका परिसरातील शेतशिवारात खरीप हंगाम २०२४ च्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यासाठी सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली होती. परंतु रक्कम न मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पूर्णेच्या धानोरा काळे व देवूळगाव दुधाटे गावाजवळील गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन केले होते. यावेळी १५ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला होता. (Parbhani Crop Insurance)
दरम्यान, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम भरपाई देण्यासाठी शासनाने ९९ कोटींचा राज्य हिस्सा विमा कंपनीकडे पाठवला होता. त्यानंतर ८ एप्रिलपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत माहिती प्रधानमंत्री पीक विमा पोर्टलवर चढविण्याचे काम जलदगतीने चालू करण्यात आले होते. त्यानंतर आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी प्रणालीद्वारे अग्रीम पीक विमा भरपाई रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली आहे. तसे संदेश शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर येत आहेत.
त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जलसमाधी आंदोलनाला मोठे यश आल्याचे बोलले जात असून शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. येत्या आठ दिवसांत सर्व विमा भरलेल्या सहभागी शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम रक्कम जमा होणार आहे.
दरम्यान, पूर्णा तालुक्यातून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आयसीआयसीआय लोंबार्ड पीक विमा कंपनीकडे खरीप हंगाम २०२४ मध्ये एकूण ७९ हजार ५७७ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. सोयाबीन पिकाचा ५५ हजार, कापूस पिकाचा १२ हजार, तर तुर पिकाचा ५ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. यात कागदपत्रांच्या काही त्रुटींमुळे आकडेवारी कमी होण्याचे संकेत आहेत.