

A four-wheeler ride on the first day of school
सेलू, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील केमापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी अनुभव ठरला. सोमवारी (दि. १६) पहिल्यांदाच शाळेच्या वाटेवर पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांसाठी शिक्षिका प्रभावती घुगे यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवित चारचाकी वाहनातून शाळेची सफर घडविली.
बालमित्रांची नवीन शाळा, नवीन शिक्षक, नवीन वर्ग आणि नवीन मित्र मैत्रिणींत गोंधळवून टाकणारी ओळख आनंदात परिवर्तीत व्हावी, शाळेची भीती न वाटता तिच्याशी आत्मियता निर्माण व्हावी, यासाठी शिक्षिकेने एक सुंदर कल्पना साकारली. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या घरी जाऊन गुलाब पुष्प आणि रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या चारचाकी गाडीत बसवून थेट शाळेत आणण्यात आले. यावेळी गावातून जाताना उत्सुकतेने पाहणारे ग्रामस्थ, पालक आणि मुलांतील आनंदाचा उत्सव पाहता झाला.
मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते, काहींनी पहिल्यांदाच कारमध्ये बसण्याचा आनंद यावेळी लुटला. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिक्षिका प्रणिता गाडे यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, अभ्यासाची पुस्तके आणि गणवेश देऊन स्वागत केले. टाळ्यांचा गजर, फुलांची सजावट आणि शिक्षकांचा प्रेमळ स्पर्श यामुळे शाळेच्या पहिल्या दिवसाचे एक अविस्मरणीय स्मरण तयार झाले होते.
या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी आणि शाळेचे दत्तक पालक अधिकारी डॉ. कृष्णकुमार चौधरी, ग्रा.पं. सदस्य भालचंद्र देशमुख यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी शिक्षिकांनी घेत लेल्या पुढाकाराचे भरभरून कौतुक केले आणि इतर शाळांनीही अशा उपक्रमांतून प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.
मुख्याध्यापक डॉ. शरद ठाकर यांनी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना शाळा ही केवळ शिक्षणाचेच नव्हे, तर आनंददायी आठवणीं-चेही केंद्र असावी, या उद्देशाने आम्ही प्रयत्नशील आहोत असे म्हटले. यावेळी नारायण आष्टकर, दगडोबा माघडे यांच्यासह अनेक पालकही उपस्थित होते. ग्रामस्थ, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी या अभिनव उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षण वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ एक दिवसाचा नव्हे, तर त्यांच्या संपूर्ण शालेय जीवनात आनंददायी सुरुवातीचा एक सुवर्णक्षण ठरला आहे.