

पूर्णा : तालुक्यातील पांगरा लासीना येथील सरपंच उत्तमराव ढोणे पाटील यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.१५ जून रोजी सकाळी ११ वाजता माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहिल्या नगर येथे स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक तथा सरपंच संघटीत चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे पाटील, प्रदेशाध्यक्ष रोहीत संजय पवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी सरपंच सेवा संघाचे मान्यवर तसेच दिगांबरराव ढोणे, सुदर्शन ढोणे, राजू गिरी, जगदीश ढोणे, गंगाधर ढोणे, माधवराव ढोणे सह आदी उपस्थित होते. आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त सरपंच उत्तमराव पाटील यांनी पांगरा लासीना गावात मागील दहा वर्षांपासून ग्रामस्थांच्या सहकार्याने गावा अंतर्गत सिमेंट रस्ते, गट्टू रस्ते, नाली बांधकाम, नदीवर बंधारे, घरकुले, स्मशानभूमी, सिंचन विहिरी, मातोश्री पांदण रस्ते, शिवशेत रस्ते, अंगणवाडी, जि प शाळा, पाणीपुरवठा, पथदिवे, देवस्थान मंदीर बांधकाम, रोहयो वरील फळबाग वृक्षलागवड आदी स्वरुपाची आदर्शवत प्रेरणादायी ग्राम विकास कामे केली आहेत.
त्यामुळेच त्यांच्या सर्वांगीण ग्राम विकास कार्याची दखल घेत सदरील पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कारा बद्दल राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आ.डॉ रत्नाकर गुट्टे, आ.राजू भैया नवघरे, आ.राजेश विटेकर यांच्यासह पूर्णा तालूका सरपंच संघटना, आ.डॉ रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने अभिनंदन केले जात आहे.