परभणी : २ हजारांची लाच घेताना महावितरणचा वरीष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात | पुढारी

परभणी : २ हजारांची लाच घेताना महावितरणचा वरीष्ठ तंत्रज्ञ जाळ्यात

मानवत; पुढारी वृत्तसेवा : नवीन बांधलेल्या गोदामामध्ये नवीन विद्युत मीटर बसविण्यासाठी एका व्यापाऱ्याकडून २ हजार रुपयांची लाच घेताना मानवत येथील महावितरणच्या शहर शाखा कार्यालयातील वरिष्ठ तंत्रज्ञ गणेश भोपे (वय ३३) याला परभणी येथील लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी (दि. १४) रात्री उशिरा येथील पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, येथील व्यापारी यांनी कृषी साहित्य ठेवण्यासाठी पाळोदी रोडवर नवीन गोदाम बांधकाम केले आहे. नवीन गोदामामध्ये विद्युत मीटर बसविण्यासाठी महावितरण कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. त्यासाठीचे कोटेशन शुल्कही भरले होते. तरी देखील मीटर बसवून मिळत नसल्याने व्यापाऱ्याने ९ फेब्रुवारीला भेटून मीटर बसविण्याची मागणी केली. परंतू तंत्रज्ञ भोपे याने अतिरीक्त ३ हजार लाचेची मागणी केली. याप्रकरणी या व्यापाऱ्याने सोमवारी (ता. १२) परभणी येथील लाचलुचपत कार्यालयात धाव घेत रीतसर तक्रार अर्ज दाखल केला होता. बुधवारी पंचासमक्ष पडताळणी कार्यवाही दरम्यान गणेश भोपे याने तडजोडीअंती २ हजार रुपयांची लाच घेतली. आजूबाजूस थांबलेल्या अधिकाऱ्यांनी तात्काळ लाचेच्या रकमेसह गणेश भोपेला ताब्यात घेऊन मानवत पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल झाला असून लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सदानंद वाघमारे, चंद्रशेखर नीलपत्रेवार, अतुल कदम, जिब्राईल शेख, कल्याण नागरगोजे, चापोह कदम यांनी सदरील कारवाई केली.

हेही वाचा : 

Back to top button