परभणी : सभेसाठीच्या शिल्लक रक्कमेतून घेतली रुग्णवाहिका; सेलूतील मराठा बांधवांचा उपक्रम | पुढारी

परभणी : सभेसाठीच्या शिल्लक रक्कमेतून घेतली रुग्णवाहिका; सेलूतील मराठा बांधवांचा उपक्रम

सेलू, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जमा केलेल्या लोक वर्गणीतील रक्कम शिल्लक राहिल्याने सेलू येथील सकल मराठा समाजाच्या वतीने त्याच पैशातून गरजू रुग्णांना सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका खरेदी केली. आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते सोमवारी (दि.१) रुग्णवाहिकेचे लोकार्पण करून नवा आदर्श निर्माण केला आहे.

मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी शहरासह गावोगावी साखळी उपोषण, रास्ता रोको यासह अनेक आंदोलने करून आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला होता. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी विविध उपक्रमातून आंदोलने केली होती. मनोज जरांगे पाटील यांनी दोन टप्प्यांमध्ये महाराष्ट्रात दौरा काढून मराठा आरक्षण संदर्भात समाज बांधवांना माहिती दिली होती. दुसऱ्या टप्प्यात २२ डिसेंबर रोजी सेलू येथील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर जरांगे पाटील यांची सभा झाली होती. सभेची तयारी करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा समाज बांधवांनी लोकवर्गणी जमा केली होती. सभेसाठी प्रचार रथ, स्टेज, साऊंड, लाईट, बॅरिगेटिंग आदीवर खर्च करण्यात आला. परंतु, मराठा समाजबांधवांनी सढळ हाताने वर्गणी दिल्याने सभेचा खर्च करुन काही लाखांची रक्कम शिल्लक राहिली होती. या पैशांचे काय करायचे? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यासाठी एक समाज बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्व जाती, धर्मातील लोकांना उपयोगी पडेल अशी वस्तू घेण्याचे ठरले. त्यानुसार रुग्णवाहिका खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर पुणे येथून ८ लाख रुपयांची रुग्णवाहिका विकत घेऊन, सोमवारी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

दरम्यान, ना नफा ना तोटा या तत्त्वावर गरजू रुग्णांना वेळेवर सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असणार आहे. सभेच्या नियोजनासाठी जमा केलेल्या शिल्लक रक्कमेतून रुग्णवाहिका खरेदी करून नवा आदर्श निर्माण केला आहे. सर्व स्तरातून याचे स्वागत होत आहे.

जरांगे पाटलांकडून कौतुक

मनोज जरांगे पाटील यांना लोकवर्गणीतून शिल्लक राहिलेल्या पैशातून रुग्णवाहिका खरेदी केल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष त्यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. मराठा समाज बांधवांच्या कार्याचे मनोज जरांगे पाटील यांनी कौतुक केले.

Back to top button