

3 lakh fraud by showing the lure of job
पाथरी, पुढारी वृत्तसेवा : मुलाला चांगली नोकरी लावतो असे आमिष दाखवत बीड जिल्ह्यातील दाम्पत्याने येथील एका नागरिकाची तब्बल ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणात पाथरी पोलिसांनी आरोपी दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
तुकाराम धोंडीबा रुमाले (वय ५२, रा. भीमनगर, पाथरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एप्रिल २०२२ ते मे २०२२ दरम्यान बीड येथील प्रदीप बाबुराव पोटभरे आणि रागिनी प्रदीप पोटभरे या पती-पत्नीने त्यांच्या मुलाला सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. या आमिषावर विश्वास ठेवून रुमाले यांनी संबंधितांना आरटीजीएस आणि रोख स्वरूपात एकूण ३ लाख रुपये दिले.
मात्र दिलेले पैसे घेऊनही नोकरी मिळवून देण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. वेळ जात असताना रुमाले यांनी वारंवार पैसे किंवा नोकरीबाबत चौकशी केली मात्र संबंधित दाम्पत्याने उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेली. यातच सातत्याने फसविले जात असल्याची जाणीव झाल्यानंतर रुमाले यांनी न्यायालयात धाव घेतली. कलम १५६ (३) नुसार न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
त्यानुसार पाथरी पोलिसांनी आरोपी प्रदीप आणि रागिनी पोटभरे यांच्या विरोधात कलम ४०३ अपहार, कलम ४०६- विश्वासभंग करून मालमत्ता अपहार, कलम ४१७फसवणूक, कलम ४२० फसवणूक व विश्वासभंग करून माल मिळविणे, कलम ३४ - सामूहिक हेतूने गुन्हा अशाप्रकारे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
सामान्य नागरिकांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये, यासाठी सावध राहणे गरजेचे आहे. सरकारी किंवा खासगी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक फसवणूक प्रकरणे सध्या समोर येत आहेत. कुणीही थेट पैशांची मागणी करत असेल तर प्रथम पोलिसांत तक्रार करणे किंवा त्याची खातरजमा करणे आवश्यक आहे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.