

पूर्णा: पूर्णा शहरापासून जवळच असलेल्या कानडखेड जवळील पूर्णा नदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावंडापैकी १३ वर्षीय मुलगा बुडाला. ही घटना आज (दि. ६) सकाळी ११.३० च्या दरम्यान घडली. घटनास्थळी महसूल, पोलीस तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे बचाव पथक दाखल झाले आहे. पाण्यात बुडालेल्या मुलाचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. अजय अशोक वैद्य (वय १३, रा. कानडखेड ता.पूर्णा) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, कानडखेड जवळील नदीपात्रात आज सकाळी अजय अशोक वैद्य व त्याचा मोठा भाऊ पांडुरंग अशोक वैद्य हे दोघे पूर्णा नदीच्या बॉम्बे पुलाजवळ शेळ्या चारण्यासाठी गेले होते. सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास दोघे भाऊ व गावातील अन्य काही मुलांसोबत ते नदीच्या पाण्यात पोहत होते. ३ मेरोजी सिद्धेश्वर धरणातून नदीपात्रात मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदी तुडूंब भरली आहे.
दरम्यान, सर्व मुले पाण्यात पोहताना अजय वैद्य यास नदीत पाणी खोल व जोराने वाहत असल्याचा अंदाज न आल्याने तो पोहताना पाण्यात बुडू लागला. त्यामुळे सोबतच्या मुलांनी आरडाओरडा सुरू केला. भाऊ पांडुरंग त्याच्या मदतीला धावून गेला. परंतु, नदीपात्रात पाणी अधिक प्रमाणात असल्याने तोही बुडत होता. नदीकाठी जनावरे चारत असलेले बाबुराव लांडे यांनी हा प्रकार पाहताच धावत आला. त्याने नदी पाण्यात उडी मारुन या दोन्ही मुलांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी नदीपात्रात शोध घेतला. तरीही तो आढळून आला नाही. नायब तहसीलदार प्रशांत थारकर, तलाठी गणेश गोरे, पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, जमादार रमेश मुजमुले यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकारी, अग्निशमन दलाचे गणेश रापतवार, अमजद कुरेशी, सोनाजी खिल्लारे, दीपक गवळी आदींनी तसेच स्थानिक मच्छीमारांनी व गावातील तरुणांनी अमोलच्या शोधासाठी मागील चार ते पाच तासांपासून शोध कार्य हाती घेतले आहे.