

परभणी : पालम रोडवर एका कारमधून १२ लाख ६५ हजार ३२० रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि.२६) मध्यरात्री निवडणूक विभागाच्या पथकासह पोलिसांच्या पथकाने केली. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने ही रक्कम सीलबंद करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.
निवडणूक विभागाचे एफएसटी पथकाचे प्रमुख एस.के.पवार हे शनिवारी (दि.२६) तहसील कार्यालयात दुपारी कार्यरत होते. सायंकाळी ७ च्या सुमारास गंगाखेड पोलिस ठाण्याचे निरीक्षक वाघमारे यांनी पेट्रोलिंग दरम्यान एका वाहनात पैसे आढळून आल्याचे सांगितले. त्यामुळे पथकप्रमुख पवार हे पथकासह त्याठिकाणी दाखल झाले. निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत असताना पालम रोडवर रेल्वे पुलाजवळून जात असलेल्या कारबाबत संशय आल्याने पोलिसांनी कारचालकाला थांबण्याचा इशारा दिला.
कार थांबवून तपासणी केली असता पाठीमागील सीटवर पैशाची बॅग असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी कार पोलिस ठाण्यात घेण्यास सांगितले असता कारचालकाने ती शहरातील जामगे वॉईन शॉप येथे नेली. पैशाची बॅग वाईन शॉप येथे ठेवली. त्यावेळी पाठोपाठ एफटीएस पथक व पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दुकानातील काँटरवर असलेल्या लाल पिशवीत १२ लाख ६५ हजार ३२० रूपयांची रोख रक्कम आढळून आल्याने ती जप्त करून सीलबंद करण्यात आली. कोषागार कार्यालये रविवारी बंद असल्याने ही रक्कम पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आली.