

मानवत, पुढारी वृत्तसेवा : तुमच्याकडे फायनान्स चा हप्ता थकीत आहे, असे सांगत रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटरसायकलस्वाराला त्रास देत असल्याच्या माहितीवरून चौकशीसाठी गेलेल्या पोलिसावर हल्ला केला. त्या तीन आरोपींच्या घरातून गुरुवारी (दि. ३) पोलिसांनी दहा वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रे जप्त करून गुन्हा दाखल केला. (Parbhani Crime News)
पवनसिंग गब्बूसिंग बावरी (वय २२), भीमसिंग जिपुसिंग बावरी (वय २०) व दिपसिंग रुबाबसिंग बावरी (सर्व रा. एकता कॉलनी, मानवत) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिपसिंग बावरी यास बुधवारी (दि. २) घटनास्थळावरून अटक केली होती.
याबाबत माहिती अशी की, पोलीस अंमलदार शेख गाझीयोद्दीन शेख हबीब व त्यांचे सहकारी नारायण सोळंके यांच्याशी मानवत ते रत्नापूर या राष्ट्रीय महामार्गांवर बुधवारी हुज्जत घालून शेख यांच्या हातात चावा घेऊन दोन्ही पोलिसांवर दगडफेक करून तुम्हाला बघून घेतो, अशी जीवे मारण्याची धमकी तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला होता. या प्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणाचा शोध घेत असताना या तिन्ही आरोपीच्या घरातून पोलिसांना गुरुवारी १० शस्त्रे सापडली. आणखी दोन आरोपींचा शोध पोलीस घेत असून अटकेत असलेल्या दीपसिंग बावरी यास मानवत न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी दिली.