

परभणी, पुढारी वृत्तसेवा : शहरात शुक्रवारी (दि.११) होणाऱ्या राज्यस्तरीय परभणी मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील सुमारे १ हजार खेळाडूंचा सहभाग राहणार आहे. या स्पर्धेस सिनेअभिनेत्री सैराट फेम रिंकू राजगुरू यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. स्पर्धेतून विजेत्यांना २ लाख रुपयांचे पारितोषिके दिली जाणार आहेत, अशी माहिती स्पर्धा आयोजक तथा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी मंगळवारी (दि.८) पत्रकार परिषदेत दिली.
महात्मा गांधी जयंती, नवरात्र दुर्गा महोत्सव व धम्म चक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी ६ वाजता नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक गोविंदसिंह परदेशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथुर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, अॅड. अशोक सोनी, आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवते, क्रीडा संघटक, मंगल पांडे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
स्पर्धेत ३ कि.मी., ६ कि.मी. व १० कि. मी. अंतराच्या प्रत्येक गटातील पहिल्या १० क्रमांकाच्या विजयी खेळाडूंना एकूण २ लाख रुपयांची पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. स्पर्धा संपताच बक्षीस वितरण खा. संजय जाधव, आ. सुरेश वरपुडकर, आ. डॉ. राहुल पाटील, माजी आ. विजय भांबळे, डॉ. सिद्धार्थ भालेराव, बाळासाहेब देशमुख आदींच्या उपस्थितीत साडेआठ वाजता होणार आहे. स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ. माधव शेजूळ, प्रा. डॉ. गुरुदास लोकरे व रणजीत काकडे यांच्या नियंत्रणाखाली १०० तज्ञ पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे.
इच्छुक स्पर्धकांनी गुरुवारपर्यंत दि. १० नावनोंदणी करून स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस प्रा. डॉ. माधव शेजूळ, रणजीत काकडे आदींची उपस्थिती होती.