

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेमुळे कोल्हापूरचे खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकून कोल्हापूर देशात ब्रॅंड बनावा, अशा शुभेच्छा आमदार सतेज पाटील यांनी दिल्या. कोल्हापूर स्पोर्टस् क्लब व रग्गेडियन आयोजित डीवायपी कोल्हापूर रन अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन रविवारी आ. सतेज पाटील यांच्या हस्ते फ्लॅग ऑफने झाले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
स्पर्धेत 5 ते 84 वयोगटातील तब्बल 6 हजाराहून अधिक स्त्री-पुरुष स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दोन महिला आणि सहा पुरुष अशा आठ दिव्यांगांनीही व्हीलचेअरवरून ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली. तपोवन मैदानावरून सुरू झालेल्या मॅरेथॉनमध्ये आमदार सतेज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यंदा मॅरेथॉनचे आठवे वर्ष होते. मॅरेथॉन 5, 10, 21, 42 आणि 50 किलोमीटर अशा अंतराच्या पाच गटांत झाली. तपोवन मैदान – रंकाळा तलाव परिसर – हॉकी स्टेडियम मार्गे- शेंडा पार्क अशा मार्गावरून विविध अंतराच्या स्पर्धा झाल्या. स्पर्धेत लोक सहकुटुंब-मित्र परिवारासह सहभागी झाले होते.
खेळाबरोबरच स्पर्धेच्या ठिकाणी झुम्बा डान्स, तपस्या अॅकॅडमीच्या मधुरा बाटे, नव्या कल्याणकर व वेदिका गुरव यांचे भरतनाट्यम, फनी गेम्स अशी विविधता एकवटली होती. यावेळी शारंगधर देशमुख, मधुकर रामाणे, प्रताप जाधव, दुर्वास कदम, निलोफर आजरेकर आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. संयोजन कोल्हापूर स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष चेतन चव्हाण, रग्गेडियनचे आकाश कोरगावकर, डॉ. प्रदीप पाटील, एस. आर. पाटील, डॉ. विजय कुलकर्णी, गोरख माळी, माजी नगरसेवक राहुल माने, आशिष तंबाके, महेश शेळके व तगडा ग्रुप आदींनी केले.