परभणी: जिल्ह्यात बोगस खत विक्रीवर बंदी घाला; दबाव गटाची मागणी
सेलू, पुढारी वृत्तसेवा : आधीच कमी पाऊस त्यात अर्धा अधिक खरीप हंगाम संपत आला आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यात विविध पंचवीस बोगस कंपन्या खते व औषधी विक्री करत आहेत. त्यावर तत्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने करण्यात आली आहे.
यावर्षीचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या मुळावर आला असून मराठवाड्यात पाऊस देखील अतिशय कमी प्रमाणात पडलेला आहे. अशा तुटपुंजा पावसात देखील शेतकऱ्यांनी शेतात बी बियाणे लावून पिके घेतली आहेत. थोड्याफार पावसामुळे पिके बोलत आहेत. मात्र, पिकांना उभारी मिळावी, याकरिता शेतकऱ्यांनी खते आणि औषधी फवारणी केली आहे.
त्यात कृषी विभागाने विविध पंचवीस कंपन्यांची खते बोगस असल्याचा निर्वाळा दिला आहे. यास जिल्हा तालुका कृषी अधिकारी व जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी, कृषी विभाग यांचा मनमानी भ्रष्ट व बेजबाबदारपणा जबाबदार आहे. त्यामुळे सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे. तसेच मोठ्या प्रमाणातील खतांच्या दरामुळे आर्थिक नुकसानही झालेले आहे. यास सर्वस्वी जिल्हा परिषद कृषी विभागातील अधिकारी जबाबदार आहेत. त्यांनी संबंधित दुकानदारांशी संगणमत करून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.
त्यामुळे यापुढे तत्काळ बोगस खते असलेल्या यादीतील इतर विक्रीवर ताबडतोब बंदी घालण्यात यावी. तसेच दुकानदारांकडे असलेला बोगस खतांचा साठा देखील जप्त करण्यात यावा. आणि ज्या दुकानदारांनी अधिकारी यांच्याशी संगणमत करून शेतकऱ्यांना बोगस खतांची विक्री केली आहे, त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कंपन्यांच्या खतांच्या विक्रीची किंमत यात देखील प्रचंड तफावत आहे. त्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. यावर तत्काळ कार्यवाही न झाल्यास 17 सप्टेंबररोजी जिल्हा परिषद कृषी विभागासमोर शेतकऱ्यांसह लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दबाव गटाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी ॲड. श्रीकांत वाईकर, गुलाब पौळ, ओमप्रकाश चव्हाल, लिंबाजी कलाल, मुकुंद टेकाळे, रामचंद्र कांबळे, दत्तात्रय कांगणे, रामचंद्र आघाव, चिंतामण दौड, लक्ष्मण प्रधान, इशाक पटेल, नारायण पवार, उद्धव सोळंके, सोनू शेवाळे, दिलीप शेवाळे, उत्तम गवारे, विलास रोडगे, मतीन मिया, परमेश्वर कांदे, दिलीप मगर, ररॉफ भाई, अशोक कलाल, जलाल भाई, उमेश काष्टे, योगेश सूर्यवंशी, अॅड. सुरेश खापरखुंटीकर, मोहन खापरखुंटीकर, केशव दिग्रसकर आदींनी निवेदनाच्या प्रती मुख्यगुण नियंत्रक पुणे, जिल्हा मोहीम अधिकारी कृषी विभाग जिल्हा परिषद परभणी यांनी दिलेल्या आहेत.
हेही वाचा