परभणी: ताडकळस येथील अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस
ताडकळस; पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील गायरान जमिनीवरील (गट क्रं. 312) अतिक्रमण व बांधकाम काढून घेण्यात यावे, अशा नोटिसा पूर्णा तहसीलदार यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती ताडकळस आणि अतिक्रमणधारकांना दिल्या आहेत.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 च्या कलम 50 नुसार शासकीय जमिनीवरील अतिक्रमण निष्कसित करण्याचा अधिकार तहसीलदार यांना प्राप्त झाला आहे. त्यानुसार यापूर्वी प्रकरणात या कार्यालयाकडून अतिक्रमण निष्कसित करण्यासाठी नोटीस 7 जुलै 2021 आणि 4 ऑगस्ट 2022 रोजी देण्यात आल्या आहेत. परंतु, अद्याप अतिक्रमण निष्कसित केले नसल्याने ही बाब गंभीर स्वरूपाची आहे.
त्यामुळे ताडकळस येथील शासकीय गायरान जमिनीवरील वाणिज्यिक प्रयोजनार्थ अनधिकृतपणे कब्जा करून केलेले अतिक्रमण दिलेल्या नोटिसीच्या 15 दिवसांच्या आत आपण काढून टाकावे, अन्यथा आपले सदर अतिक्रमण शासकीय खर्चाने निष्कासित करण्यात येणार आहे. त्यासाठी खर्चाची रक्कम महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील तरतुदीनुसार महसुलाची थकबाकी म्हणून आपल्याकडून वसूल करण्यात येणार आहे, असे या नोटिशीत म्हटले आहे.
हेही वाचा

