

Yavatmal Mulawa Tribal Woman Murdered
उमरखेड : पत्नीला वाममार्गाला लावत असल्याचा संशय मनात धरून शेजारी राहणाऱ्या आदिवासी महिलेची घरात घुसून कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील मुळावा येथील शांतीनगर परिसरात मंगळवारी (दि. २९) रात्री घडली. या प्रकरणी पोफाळी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेअंतर्गत खुनासह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मयत महिलेने याच आरोपीविरोधात महिनाभरापूर्वी तक्रार दिल्याची बाब समोर आल्याने पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुख्माबाई शंकर सरकुंडे (वय अंदाजे ६०) या आंध (आदिवासी) समाजातील असून मुळावा येथील शांतीनगरमध्ये वास्तव्यास होत्या. त्यांचा मुलगा लक्ष्मण शंकर सरकुंडे (रा. खर्षी, ता. पुसद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेजारी राहणारा गजानन खंडुजी डांगे (वय ४२) हा आपल्या पत्नीबाबत संशय घेत रुख्माबाई यांच्यावर वारंवार आरोप करीत होता. पत्नीला दुसऱ्याकडे पाठवत असल्याचा संशय व्यक्त करून तो त्यांच्याशी सतत वाद घालत होता आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देत होता.
मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपी गजानन डांगे हा रुख्माबाई यांच्या घरात घुसला. त्याने कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात रुख्माबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक घटनास्थळी पोहोचले असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश शेंबडे तसेच न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी आरोपीला हत्येसाठी वापरलेल्या कुऱ्हाडीसह ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोफाळी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५०/२०२६ नोंदविण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३५१(२)(३) तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील कलम ३(२)(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अमर मोहिते करीत आहेत.
या हत्येनंतर एक गंभीर बाब समोर आली आहे. रुख्माबाई सरकुंडे यांनी आरोपीकडून होत असलेल्या सततच्या त्रासाबाबत सुमारे महिनाभरापूर्वी पोफाळी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. त्या तक्रारीवर नेमकी कोणती कारवाई झाली, आरोपीविरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वेळेत प्रभावी कारवाई झाली असती, तर ही घटना टाळता आली असती का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
या प्रकरणातील पूर्वीच्या तक्रारीची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक यंत्रणा अधिक प्रभावी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. नागरिकांच्या मते, वेळेत योग्य कारवाई झाली असती, तर एका महिलेचा जीव वाचू शकला असता.