

'Women's rule' returns to Nanded Municipal Corporation
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या नव्या सभागृहातही पुढील अडीच वर्षे महिला राज कायम राहणार असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. महापौरपदाच्या आरक्षणात सर्वसाधारण महिला प्रवर्गावर शिक्कामोर्तब झाल्याने, भाजपच्या पहिल्या महापौरपदाचा मान एका महिलेला मिळणार आहे. या निर्णयामुळे महिला नगरसेविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून पुरुषांचा मात्र हिरमोड झाला आहे.
२०१५ ते २०२२ या काळात काँग्रेसच्या सत्ताकाळात सलग पाच महिलांनी महापौरपद भूषविले होते. आता नव्या सभागृहात भाजपचे बहुमत असून, त्यांच्या ४५ नगरसेवकांमध्ये १३ महिला सर्वसाधारण प्रवर्गातील आहेत. त्यातील १२ जणी या पदासाठी पात्र ठरू शकतात.
दुसऱ्यांदा निवडून आलेल्या सुदर्शना महेश खोमणे, ज्योती किशन कल्याणकर, कविता संतोष मुळे तसेच कविता गड्डम यांची नावे चर्चेत आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाकडे गटनोंदणीसाठी जात असतानाच हे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये महेश खोमणे यांच्या पत्नी सुदर्शना खोमणे यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेल्या जवळकीमुळे सुदर्शना खोमणे यांना प्रभाग बदलून उमेदवारी देण्यात आली होती, त्यामुळे त्यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापौरपदाच्या शर्यतीतील महिला
ज्योती किशन कल्याणकर, कविता संतोप मुळे, शांभवी प्रवीण साले, वैशाली मिलिंद देशमुख, कविता नागनाथ गड्डम, सदिच्छा सोनी-पाटील, सुदर्शना महेश खोमणे, ऋची अल्केश भारतीया, अमृताबाई ठाकूर, मनप्रीतकौर कुंजीवाले, अनुराधा राजू काळे आणि सुवर्णा सतीश बस्वदे. महापौरपद अडीच वर्षांसाठी असले, तरी प्रत्येकी सव्वा वर्षात दोघींना संधी देण्याचा विचार भाजपामध्ये सुरू आहे. उपमहापौरपदासाठीही अशीच विभागणी केली जाणार आहे, असे सांगण्यात आले.
नव्या महापौरांसाठी कक्ष सुसज्य
नवीन महापौरांसाठीचा महानगरपालिकेतील कक्ष काही महिन्यांपूर्वीच सुसज्य करण्यात आला आहे. कक्षामधील फर्निचर, रंगरंगोटी व इतर सुशोभिकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. महापौरासाठी शासकीय वाहनांची सोय आणि त्यासाठी इंधन व देखभालीचा खर्च दिला जातो. महापौरांच्या वाहनाच्या खरेदीसाठी शासनाने मोठा खर्चही मंजूर केला आहे.
महापौरांच्या सुरक्षेसाठी महापालिकेत सुरक्षा विभागही कार्यरत असतो. याशिवाय निवास, संपर्क खर्च व इतर प्रशासकीय सुविधाही मिळतात. नांदेड महापौरांचे नेमके मानधन आणि भत्ते किती आहेत याची थेट माहिती मिळाली नसली तरी ते महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार ठरतात. त्यात वाहनभत्ता, सुरक्षा व इतर सुविधांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. महापौरांना दरमहा मानधन मिळते जे महापालिकेच्या आर्थिकस्थिती आणि शासनाच्या धोरणानुसार वेळोवेळी बदलते, अशी माहिती मिळाली आहे.