

माळाकोळी : लोहा तालुक्यातील खेडकरवाडी येथे एका २१ वर्षीय तरुणाने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निखिल रावसाहेब नळगे असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
निखिल नळगे हा तरुण माळाकोळी येथील एका कापड दुकानात काम करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २०) रात्री उशिरा 'शेताकडे जाऊन येतो' असे घरच्यांना सांगून तो बाहेर पडला होता. मात्र, रात्र उलटूनही तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी शोध घेतला असता, बुधवारी (दि.२१) पहाटे स्वतःच्या शेतात त्याने झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच माळाकोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. निखिलच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. ऐन विशीत असलेल्या मुलाने अशा प्रकारे टोकाचे पाऊल उचलल्याने खेडकरवाडी गावावर शोककळा पसरली आहे.