

Madhavrao Patil Jawalgaonkar Party Workers Meeting
हिमायतनगर : मतदारसंघातील जनताच माझे सर्वस्व असून त्यांच्या विश्वासाच्या बळावरच आजपर्यंत राजकीय वाटचाल केली आहे. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करताना प्रत्येक निवडणुकीत मतदारांनी खांद्याला खांदा लावून साथ दिली. त्यामुळे आगामी राजकीय निर्णय घेताना प्रत्येक गावातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढील दिशा ठरविणार असल्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी स्पष्ट केले.
जवळगाव येथे २० जून रोजी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक माजी आमदार जवळगावकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, सेवा सहकारी संस्थांचे अध्यक्ष व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काहींनी माजी आमदार जवळगावकर जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे सांगितले, तर काहींनी त्यांनी काँग्रेस पक्षातच राहून नेतृत्व करावे, पक्ष सोडू नये, असे आवाहन केले.
माधवराव पाटील जवळगावकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीत काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाण्यास विरोध दर्शविला, तर काहींनी विकासाच्या दृष्टीने भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला. याबाबत हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक लवकरच हदगाव येथे आयोजित करण्यात येणार असून त्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे संकेत देण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार जवळगावकर म्हणाले की, काँग्रेस पक्षाने दिलेल्या प्रत्येक जबाबदारीचे त्यांनी प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठतेने पालन केले आहे. आजही ते पक्षाशी निष्ठावान आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील कार्यपद्धतीबाबत चिंता निर्माण झाली असून भविष्यातील राजकीय दिशा आणि मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने सर्व पर्यायांचा विचार करणे आवश्यक झाले आहे.
मतदारसंघाचा विकास, जनतेची कामे आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन दोन्ही तालुक्यांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल. कोणताही निर्णय घाईत न घेता प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊनच भाजप प्रवेशासह पुढील राजकीय भूमिका निश्चित केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस हिमायतनगर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.