

विशेष प्रतिनिधी
नांदेडः हिंगोली लोकसभा मतदारसंघातील राजकारणात खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या राजकीय भूमिकेमुळे निर्माण झालेली खळबळ अद्याप शांत झालेली नसतानाच आता हदगाव विधानसभा मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे. काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी २० जून रोजी जवळगाव येथे बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमुळे ऑपरेशन ‘टायगर’ नंतर आता ऑपरेशन ‘लोटस’ची चर्चा जोर धरू लागली आहे. जवळगावकर भाजपमध्ये प्रवेश करणार का, की काँग्रेसचीच पुढील रणनीती जाहीर करणार याकडे कार्यकर्त्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या राजकीय निर्णयानंतर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी अचानक मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच, सेवा सहकारी सोसायट्यांचे संचालक, चेअरमन, काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
जवळगावकर यांच्या राजकीय वाटचालीचा इतिहास काँग्रेसशी घट्ट जोडलेला आहे. २००४पासून काँग्रेसमधून सक्रिय राजकारणात आलेले जवळगावकर हे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या विचारपरंपरेतील नेतृत्व मानले जाते. २००९मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांना हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांनी विजय मिळवत विधानसभेत प्रवेश केला.
मात्र खा.अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणात अनेक बदल घडले. त्यानंतर जवळगावकर यांच्याबाबतही विविध तर्कवितर्क सुरू झाले. त्यांच्या समर्थकांमधील एका गटाला त्यांनी भाजपमध्ये जावे असे वाटत असल्याची चर्चा आहे, तर दुसरा गट त्यांच्या काँग्रेसनिष्ठेवर विश्वास व्यक्त करत आहे. त्यामुळे उद्याची बैठक केवळ संघटनात्मक आहे की राजकीय दिशा बदलणारी, हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे.
विशेष म्हणजे अलीकडील विधान परिषद निवडणूक आणि त्यानंतरच्या घडामोडींमुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत जवळगावकर यांच्या बैठकीतून कोणता संदेश जाणार, ते आगामी निवडणुकांसाठी कोणती भूमिका घेणार आणि भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळणार की नवे वळण मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आज जवळगाव येथे महत्त्वपूर्ण बैठक
ऑपरेशन टायगर नंतर जिल्ह्यात ऑपरेशन लोटसची चर्चा राजकीय वर्तुळात असतानाच माजी आ. माधवराव जवळगावकर यांच्या जवळगाव येथील निवासस्थानी आज शनिवार २० जून रोजी हदगाव विधानसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर जवळगावकर काँग्रेसमध्येच राहणार की भाजपचे कमळ हाती घेणार ? हे चित्र स्पष्ट होणार आहे.