

Ashok Chavan guides the 'Samarsata' conference!
विशेष प्रतिनिधी
नांदेड: काँग्रेस पक्षाच्या घनगर्द प्रभावाच्या काळात वेगवेगळ्या साहित्य-नाट्य संमेलनांची पोषक भूमी म्हणून नावारूपास आलेल्या नांदेड नगरीमध्ये गेल्या वर्ष-दीड वर्षात भाजपाचा नवा डाव सुरू होताच महाराष्ट्र समरसता साहित्य परिषदेने आपल्या २०व्या साहित्य संमेलनासाठी नांदेडची निवड केली असून माजी मुख्यमंत्री, भाजपा खासदार अशोक चव्हाण यांच्यावर संमेलनाच्या मार्गदर्शकाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
येत्या २ व ३ ऑगस्ट दरम्यान 'समरसता'चे २०वे साहित्य संमेलन साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक पद्मश्री नामदेव चं. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली भरणार असून भाजपाचे खासदार डॉ. अजित गोपछडे हे या सांस्कृतिक सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत. समरसताचे पहिले साहित्य संमेलन १९९८ साली जळगाव येथे झाले होते. त्यानंतरच्या २६ वर्षांत १९ संमेलने पार पडली.
नांदेड शहराला १९६५पासून मोठ्या साहित्य-नाट्य संमेलनांची परंपरा आहे. शंकरराव चव्हाण, पद्मश्री श्यामराव कदम या जुन्या नेत्यांनी आपल्या प्रभावाच्या काळात अशा उपक्रमांमागे बळ उभे केले. १९८५ साली अ.भा. मराठी साहित्य संमेलनही झाले. अनेक वैचारिक संमेलने नदिडला झाली. या काळात जिल्ह्यात काँग्रेसचा दबदबा होता, भाजपाचे नांदेडमधील स्थान दुय्यम असल्याचे पाहून 'समरसता चे आयोजक मागील २७ वर्षे या संमेलन नगरीपासून दूरच राहिले. याच परिवारातील नांदेडचे भूमिपुत्र प्रा. शेषराव मोरे यांनी 'समरसता' च्या १६व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. हे संमेलन लातूर येथे घेण्यात आले.
गेल्यावर्षी नांदेडमधील अशोक चव्हाण आणि अजित गोपछडे यांना भाजपाने राज्यसभेवर घेतले. नंतरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे ५ आमदार निवडून आले तर या निवडणुकीत काँग्रेसचा सफाया झाल्यानंतर खा. अशोक चव्हाण यांनी भाजपाला नांदेड महानगरातही अव्वलस्थानी आणण्याच्या हालचाली सुरू केल्या असून आपल्या पक्षाला उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे, वेगवेगळ्या समूहांना जोडून राहण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले असून समरसता साहित्य संमेलनातील त्यांचा सहभाग वरील पार्श्वभूमीवर लक्षवेधी बनला आहे.
नांदेडमधील भक्ती लॉन्सच्या परिसरात होणाऱ्या या संमेलनाच्या आयोजनात भाजप-संघ परिवारातील दोन संस्थांचा पुढाकार आहे तर इतर भार भाजपाच्या दोन खासदारांनी स्वीकारला असला, तरी उद्घाटन सोहळ्यासाठी भाजपाच्या कोणत्याही नेत्यास पाचारण करण्यात आलेले नाही. भदंत डॉ. राहुल महाथेरो हे संमेलनाचे उद्घाटक असून प्रमुख पाहुणे म्हणून अनुसूचित जाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर मकवाणा उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवसांच्या या साहित्य संमेलनामध्ये चार निमंत्रितांचे कवि संमेलन, गझल मुक्त मंच, एक प्रकट मुलाखत असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. नव्वदोत्तरी साहित्याशी संबंधित वेगवेगळे विषय परिसंवादामध्ये निवडण्यात आले आहेत. माजी खासदार प्रदीपदादा सवत यांची मुलाखत पहिल्या दिवशी दुपारच्या सत्रात होईल. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील नामवंतांसह नव्या पिढीतील साहित्यिक पत्रकारांना संमेलनासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. स्थानिक कविंनाही संधी देण्यात आली असल्याचा दावा संयोजकांनी केला.