

Umarkhed Pusad ETS Survey
प्रशांत भागवत
उमरखेड : वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी अवैध उत्खनन व विक्रीची पुराव्यांशी तक्रार होऊन ही उमरखेड, पुसद परिसरात गेल्या दहा महिन्यांपासून गौण खनिजांच्या अनियमित उत्खननाची ईटीएस (ETS) मोजणी न झाल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात तक्रारकर्ते अमोल कोमावार यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उमरखेड आणि पुसद यांच्याकडे पुन्हा नव्याने तक्रार दाखल करुन तातडीने ईटीएस मोजणी करण्याची मागणी केली आहे.
वर्धा यवतमाळ- नांदेड रेल्वे प्रकल्पातील कंत्राटदार तसेच उपकंत्राटदार तसेच काही गौण खनिज माफियांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण होत आहे. त्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक ईटीएस मोजणीला विलंब केला जात आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलावर गदा येत आहे आणि नैसर्गिक संपत्तीचा प्रचंड ऱ्हास होत आहे, असा गंभीर आरोप कोमावार यांनी केला.
संबंधित अधिकाऱ्यांना शेवटची संधी देत तत्काळ तक्रारदाराच्या उपस्थितीत ईटीएस मोजणी करण्याची मागणी केली आहे. तसेच मोजणीनंतर होणारा दंड दोषी रेल्वे कंत्राटदार, उपकंत्राटदार आणि गौण खनिज माफियांच्या खाजगी संपत्तीतून वसूल करण्याची मागणीही तसेच दोषी कंपन्यांना काळया यादीत टाकण्याची मागणी केली आहे. जर प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाही, तर या संपूर्ण प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची कर्तव्यातील कसूर आणि आर्थिक स्वार्थ स्पष्ट होईल. त्यानुसार न्यायालयीन कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
उमरखेड आणि पुसद तालुक्यात रेल्वे प्रकल्पातील कोट्यवधी रुपयांचे गौण खनिज लंपास करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, एका कंपनीला दिग्रस मध्ये अवैध उत्खनन प्रकरणी अनेकदा दंड झाल्यानंतर लागुनच असलेल्या दोन तालुक्याच्या सीमेवर पुसद व उमरखेड मध्ये मात्र सर्व काही आलबेल सुरु असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार गंभीर असल्याने उपविभागीय अधिका-यांकडे तक्रार करुन ईटीएस मोजणीची मागणी केल्याचे अमोल कोमावार यांनी सांगितले.
(Electronic Transit Slip – ई-टी-एस) ही शासनाची डिजिटल मोजणी आणि नियंत्रण प्रणाली आहे, जी गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक यावर देखरेख ठेवते. या प्रणालीद्वारे उत्खनन झालेल्या खनिजाचे मोजमाप, प्रमाणपत्र आणि वाहतूक परवाना ऑनलाइन पद्धतीने तपासले जाते. प्रत्येक ट्रक किंवा वाहनासोबत ई.टी.एस. स्लिप देण्यात येते, ज्यावर खनिजाचा प्रकार, प्रमाण, उत्खनन स्थळ, गंतव्यस्थान आणि परवान्याची माहिती नमूद असते. वर्धा, यवतमाळ, नांदेड रेल्वे प्रकल्पात कुठेच ईटीएस मोजणी केली जात नसल्याने गौण खनिजाची लूट सुरु आहे. कळंब येथे ईटीएस मोजणी करुन कंत्राटदाराला 33 कोटीचा दंड ठोठावण्यात आला. त्यामुळे गेल्या काही वर्षांत झालेल्या अवैध उत्खननाची ईटीएस मोजणी करुन कारवाई करावी, अशी मागणी आहे.