

Vishnupuri Project water stock
नांदेड, पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीच्या लाभक्षेत्रात किरकोळ पाऊस झाल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पात लक्षणीय आवक नाही. तरी देखील मागील महिन्यापासून कमी-अधिक प्रमाणात जलसाठा 'जैसे थे' आहे. दि. २९ मे रोजी २०.०५ टक्के साठा होता. आज दि. ३० जुलै रोजी तो २३.२२ टक्के आहे. विशेष म्हणजे महानगर पालिकेला प्रतिदिन ०.१२ दलघमी पाणीपुरवठा केला जातो. शिवाय ग्रामीण, औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा केल्यानंतर शेतीला सुद्धा पाणी दिले जाते. हा दैनंदिन उपसा होऊन साठा समाधानकारक आहे.
पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे विष्णुपुरी प्रकल्पात जून अखेर स्थिती बऱ्यापैकी आहे. दरवर्षी नांदेडमध्ये जुलैच्या मध्यापासून दमदार पावसाला सुरवात होते. त्यामुळे येत्या काळात पाण्याची आवक चांगली होऊ शकते. विष्णुपुरी प्रकल्पातून महापालिकेला दरवर्षी ४३ दशलक्ष घनमीटर, औद्योगिक वसाहतीला २ दलघमी ग्रामीण भागात पिण्यासाठी वार्षिक ४ दलघमी पाणी दिले जाते.
याशिवाय शेतीसाठी राखीव साठा असतो. वास्तविक विष्णुपुरी प्रकल्पाचा उद्देश मुळात शेतीला पाणी पुरवण्यासाठी आहे. आज रोजी विष्णुपुरीत २३.२२ टक्के जलसाठा आहे. तर वरील भागात अंतेश्वर बंधाऱ्यात १० दलघमी साठा आहे. तर दिग्रस बंधाऱ्यात १ मीटर पाणी पातळी वाढली आहे.
नांदेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पात मागील दोन दिवसांपासून पाण्याची आवक सुरु झाली आहे. सोमवारी (दि. ३०) २.९३० दलघमी पाणी दाखल होत होते. अंतेश्वर बंधाऱ्यात ३.७२० दलघमी (२६.०३ टक्के) तर लोअर मानार (बारुळ) ७२.६४० दलघमी ५२.५६ टक्के) जलसाठा आहे. अपर मानार (लिंबोटी) मध्ये १९.७१० दलघमी (२६.०३) टक्के) साठा आहे. नांदेड साठी थेट लाभकारक असलेल्या इसापूर (जि. वाशिम) धरणात ९२.९१९ दलघमी या प्रमाणात आवक सुरु असून या धरणाचा जीवंत साठा ४९८.३२३ दलघमी अर्थात ५१.७९ टक्के आहे.