

Dr. Minal Patil Khatgaonkar is interested in the post of District President of 'NCP'!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील तीन अध्यक्षांची निवड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दक्षिण जिल्ह्यासाठी नवीन अध्यक्ष निवडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून त्यात डॉ. मीनल पाटील खतगावकर यांचेही नाव विचाराधीन असल्याची माहितीसमोर आली आहे.
दोन वर्षांपूर्वी या पक्षात फूट पडली तेव्हा जिल्ह्याच्या तत्कालीन कार्यकारिणीने खा. शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय एकमताने घेतला होता. त्यानंतर अजित पवार गटाने आपले जिल्हाध्यक्ष निवडले. नांदेड (दक्षिण) जिल्ह्यासाठी दिलीप धर्माधिकारी यांची तेव्हा निवड झाली होती; पण आता त्यांच्याजागी अन्य कार्यकर्त्यांची निवड केली जाणार आहे.
या संदर्भात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षातल्या निवडक स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. ज्येष्ठ नेते भास्करराव खतगावकर आणि पक्षाच्या जिल्ह्यातील एकमेव आमदाराने विचारविनिमय करून जिल्हाध्यक्ष पदासाठी नाव सुचवावे, असे पक्ष नेतृत्वाकडून सांगण्यात आले आहे. येथे मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील बैठकीसाठी निवडक नेते आणि पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. खतगावकर त्या बैठकीत सहभागी होऊ शकले नाहीत; पण त्यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील बैठकीस उपस्थित होत्या.
पक्षातील माहीतगारांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाध्यक्ष पदासाठी नायगावचे शिवराज पाटील होटाळकर, अशोक पाटील मुगावकर, डॉ. मीनल पाटील खतगावकर यांच्यासह अन्य काही जण इच्छुक आहेत.
पक्षनेतृत्वाने जिल्ह्यातील दोन प्रमुख नेत्यांवर अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी टाकली आहे. पुढील काही आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या जिल्हाध्यक्षांचे नाव जाहीर होईल. दरम्यान, जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागेल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
पक्षाच्या जिल्ह्यातील आमदारांचा कल कोणाच्या बाजूने आहे, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण त्यांचे पुत्र जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत नसल्याचे सांगण्यात आले.