

Villagers' health deteriorated due to drinking contaminated water
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: चेनापूर तांडा (ता. अर्धापूर) येथील विहिरीचे दूषित पाणी प्याल्याने ७० ते ७५ ग्रामस्थांना अतिसार व उलट्यांचा त्रास सुरू झाला. शुक्रवार (दि.१७) सकाळी हा प्रकार घडला. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. शुक्रवारी सायंकाळीच वैद्यकीय पथक गावात दाखल झाले.
मागील दोन महिने अतिवृष्टी, पूर व संततधार यामुळे गावोगावची जलाशये प्रदूषित झाले आहेत. पावसाळ्यानंतर दरवर्षीच कुठेना कुठे हे दूषित पाणी प्याल्याने आजारपणाच्या तक्रारी उद्भवत आहेत. १० दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे शेतकरी रात्रंदिवस शेती कामात व्यस्त आहेत.
सोयाबीनच्या काढणीला वेग आला असून गडबडीत हाती लागेल ते पाणी पिले जात आहे, अशातलाच हा प्रकार आहे. असाच प्रकार वर्षभरापूर्वी नेरली (ता. नांदेड) या गावातसुद्धा झाला होता. चेनापूर तांडा येथे विहिरीतील पाणी प्याल्याने ७०-७५ ग्रामस्थांची प्रकृती बिघडली. त्यांना अतिसार व उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे नजीकच्या रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. पैकी दोन गर्भवती महिलांना अर्धापूर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. उपचाराअंती सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, सदर माहिती सर्वत्र पसरल्यामुळे खळबळ माजली. आता आरोग्य विभागाच्या वतीने गावातील पाण्याची टाकी, पाईपलाईन व विहिरीची तपासणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार नेमका कशामुळे घडला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.