South Central Railway Diwali Special Train
नांदेड, पुढारी वृत्तसेवा: दिवाळी तोंडावर असताना दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून अद्याप मागणी असलेल्या मार्गावर दिवाळी विशेष रेल्वे सोडण्यात आली नाही. तर, दुसरीकडे एकेरी फेरी असलेल्या विशेष गाड्या सोडण्यावर विशेष भर दिला जात आहे. ते ही गाडी प्रस्थानाच्या एक दिवस पूर्वी कळविण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ होत आहे. याचा प्रवशांमधून संताप व्यक्त होत आहे.
दमरेकडून सध्या एकेरी फेऱ्या असलेल्या आत्तापर्यंत तीन रेल्वे गाड्यांचे प्रसिध्दी पत्रक काढण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने नांदेड उधना (सुरत), नांदेड निजामोद्दीन, तिरूपती-उधना या गाड्या एकेरी सोडण्यात आल्या आहेत. तर, दि. १२ ऑक्टोंबर रोजी नांदेडवरून दिल्लीसाठी एकेरी विशेष गाडी सोडण्यात आली आहे. मात्र, गाडी प्रस्थानाच्या एक दिवस पूर्वी नियोजन करण्यात आल्यामुळे प्रवाशांची तारांबळ झाली. यामुळे ज्या मुख्य मागण्या आहेत, त्याकडे दक्षिण मध्य नांदेड विभाग दुर्लक्ष करत आहे.
मराठवाड्यातून पुण्यासाठी केवळ दोनच नांदेड विभागासाठी रेल्वे आहेत. दि. २० ऑक्टोंबर दरम्यान, या दोन्ही गाड्यांचे तिकीट उपलब्ध नाहीत. यामुळे सहाजिकच प्रवाशी जनता पर्यायी मार्गाचा उपयोग करते. सध्या पुणे ते नांदेड प्रवासाठी ट्रॅव्हल्सने दोन ते तीन हजार रूपये भाडे मोजावे लागत आहेत. जनतेतून सातत्याने मागणी होत असताना पुण्यासाठी आजच्या तारखेपर्यंत एकही विशेष रेल्वे सोडण्यात आलेली नाही.
केवळ दक्षिणेकडे प्राधान्य असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जालना-तिरूपती, जालना-तिरूच्चर, नांदेड-अनाकपल्ली (आंध्रप्रदेश) या मार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. दक्षिणेसाठी रेल्वे विभाग लवकर रेल्वे घोषीत केल्या जातात. परंतू, महाराष्ट्रात नांदेडहून पुणे, सोलापूर, कोल्हापूर व नागपूर यामार्गावर कुठल्याच गाड्या सोडण्यात येत नाहीत. प्रवाशांनी व रेल्वे संघटनांनी रेल्वे विभागाशी वारंवार संपर्क साधून कुठल्याच प्रकारचा प्रतिसादत मिळत नाही.