

जळकोट : नांदेड - जळकोट - उदगीर - बिदर राष्ट्रीय महामार्गावरील तिरुका (ता जळकोट ) येथील तिरु नदीवरील जुन्या पुलाला पुराच्या दणक्याने तडे गेले असून त्यामुळे पुलाचा काही भाग कोसळला आहे. हा जुना पूल सध्या धोकादायक बनला आहे. या कमकुवत पुलावरुन वाहने जा ये करताना अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे झाले आहे.
नांदेड - कंधार - जळकोट - उदगीर - बिदर हा राष्ट्रीय महामार्ग अस्तित्वात येण्यापूर्वी कंधार - जळकोट - उदगीर हा राज्य महामार्ग अस्तित्वात होता. या राज्य महामार्गासाठी कित्येक वर्षांपूर्वी तिरु नदीवर तिरुका (ता जळकोट ) येथे पूल बांधण्यात आला आहे. या मार्गाचे सध्या राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले आहे. तिरु नदीवर राष्ट्रीय महामार्गासाठी नवीन बांधकाम पूल बांधकाम रखडले गेल्याने सध्या जुन्या पुलावरुनच वाहतूक सुरू आहे.
हा राष्ट्रीय महामार्ग निर्माण झाल्याने या रस्त्याने जात नव्हती अशी एकापेक्षा एक अजस्र वाहने या महामार्गावरुन आता जाऊ लागली आहेत. इतर वाहनांचीही प्रचंड वर्दळ या रस्त्यावर पहावयास मिळत आहे. तिरुका येथील नवीन पूल निर्माण झाला नसल्याने जुना पूलच वापरात आहे. हा जुना पूल सध्या धोकादायक बनला आहे. त्यामुळे त्याची तांत्रिक चाचणी होणे आवश्यक आहे. एखाद्या स्थापत्य वास्तूला, पुलाला 15 वर्षे झाल्यानंतर त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. त्यामुळे या पुलाची सध्यस्थिती, त्याचा तांत्रिक प्रवास तसेच तो वाहतुकीस योग्य आहे की नाही हे याची चाचणी होणे गरजेचे आहे.
या पुलावरुन वाहतूक करणे ही बाब त्यावरुन जा ये करणारे वाहनधारक व प्रवासी यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. जळकोट नुकत्याच झालेल्या ढगफुटीने या पुलावरुन पाणी वाहिले असून नदीला आलेल्या पुराचा जबरदस्त दणका बसला आहे. पुलाला तडे जाऊन काही भाग कोसळला आहे. यापूर्वीही अनेकवेळा झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तिरु नदीवरील पूल कमकुवत बनला आहे. त्यामुळे या या पुलावरुन बिनधास्त वाहतूक सुरु ठेवणे जीवघेणे ठरणार आहे.
ग्राम पंचायत तिरुका व ग्राम पंचायत अधिकारी एस. एम. पाटील यांनी या पुलावरुन असलेल्या धोक्याची व घ्यावयाच्या दक्षतेची जाणीव पुलाच्या पडलेल्या भागाच्या छायाचित्रांसह करुन दिलेली आहे. त्यामुळे या पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे व तपासणी अंती जुन्या पुलावरुन वाहतूक करणे धोकादायक आहे किंवा नाही हे राष्ट्रीय महामार्ग विभागाने जाहीर करावे अशी मागणी जोर धरत आहे