नांदेड; पुढारी वृत्तसेवा : लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे बाळूमामा पालखीनिमित्त आयोजित भंडार्याच्या कार्यक्रमात भगरीतून दोन हजारांवर लोकांना विषबाधा झाली. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि सोन्ना येथेही भगरीतून बाधा झाल्याची घटना घडली आहे.
कोष्टवाडी येथे मंगळवारी रात्री भगरीचा प्रसाद घेण्यासाठी सावरगाव, नसरत, रिसनगाव, हरणवाडी, अष्टूर परिसरातील लोक मोठ्या संख्येने आले होते. त्यांनी प्रसाद घेतल्यानंतर अनेकांना उलटी, डोकेदुखी, चक्कर असे प्रकार सुरू झाले. त्यामुळे रात्री दोन वाजल्यापासून लोहा शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांत बाधित लोक दाखल होण्यास प्रारंभ झाला. या घटनेची माहिती कळताच पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी शहरातील सर्व खासगी रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेला सतर्क केले.
गंगाखेड परिसरात भगरीतून 29 जणांना विषबाधा झाली. एकादशीच्या निमित्ताने शहर व ग्रामीण भागात उपवास ठेवणार्या भाविकांचा त्यात समावेश आहे. एकादशीनिमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमात विषबाधेचा प्रकार घडला. संबंधितांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.