

नांदेड ः नांदेड शहरात अनेक दिवसांपासून घरफोड्या करणारे दोन अट्टल चोर स्थानिक गुन्हे पथकाच्या जाळ्यात अडकले. शुक्रवारी (दि.नऊ ) रोजी पोलिसांनी दोन्ही चोरट्यांकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह तब्बल साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबत अधिक अशी की, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे सापळा रचून सय्यद हनिफ सय्यद जाफर (वय 23) व संजय पंडित नामपुरे (वय 34) दोघं या.महेबुबनगर नांदेड ताब्यात घेत चौकशी केली असता. दोघांनी ही भाग्यनगर, शिवाजीनगर व विमानतळ या तीन पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या केल्याची कबुली दिली.
पथकाने चोरट्यांकडून तीन तोळे दोन ग्रॅम सोन्याचे दागिने, 199 ग्रॅम चांदीचे दागिने व एक दुचाकी असा एकूण साडेचार लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मिलिंद कांबळे हे करीत आहेत. या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.