

किनवट: गोकुंदा शहरातील ईदगाह परिसरात अवैधरीत्या सागवान लाकडापासून फर्निचर तयार केले जात असल्याचा प्रकार वनविभागाच्या छाप्यात उघडकीस आला. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शुक्रवारी (दि. ३०) दुपारी सुमारे १२.१५ वाजता वनविभागाने अचानक छापा टाकून सागवानाचे सोफा व डायनिंग टेबल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. मात्र, या कारवाईदरम्यान संबंधित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
छाप्यावेळी एका अज्ञात व्यक्तीच्या घरासमोर अवैधरित्या सागवान फर्निचरची निर्मिती सुरू असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेला सर्व सागवान माल वनपरिक्षेत्र कार्यालयात जमा करण्यात आला. या प्रकरणी पीओआर क्र. ०१/२०२६ नोंदविण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या सागवान लाकडाचे एकूण १६२ नग, घनमीटर ०.३४९ इतके प्रमाण असून, त्याची अंदाजे किंमत ७ हजार ३६४ रुपये असल्याची माहिती वनविभागाने दिली.
ही कारवाई उपवनसंरक्षक कार्यालय, नांदेड येथील उपवनसंरक्षक केशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक किरण चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एल. राठोड तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी (फिरते पथक) एन. एन. केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रत्यक्ष कारवाईत वनपरिमंडळ अधिकारी बी. टी. जाधव, एस. एम. कोंपलवार, वनरक्षक बालाजी झंपलवाड, महेश भोरडे, सुधाकर उंबरहांडे व वाहनचालक बाळकृष्ण आवले सहभागी होते.
या प्रकरणातील फरार आरोपीचा शोध सुरू असून, अवैध सागवान तस्करी व फर्निचर निर्मितीप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे वनविभागाने कळविले आहे.