

Thieves looted an SBI ATM in Nanded
नांदेड : पुढारी वृत्तसेवा
नांदेड शहरातील तरोडा खुर्द परिसरात चोरट्यांच्या एका टोळीने चक्क एसबीआय बँकेचे एटीएम मशीनच पळवून नेल्याची धक्कादायक घटना मंगळवारी एका पहाटे घडली. चोरट्यांनी पिकअप व्हॅनमधून हे मशीन नेले असून, हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा शिवारात हे मशीन रिकाम्या अवस्थेत फेकून दिलेले आढळले. मशीनमधील ६ लाख ७३ हजार रुपयांची रोख रक्कम काढून चोरट्यांनी पोबारा केला आहे.
नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून एटीएम फोडण्याचे सत्र सुरूच असताना, आता थेट मशीनच पळवल्याने खळबळ उडाली आहे मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका चॉकलेटी रंगाच्या पिकअप व्हॅनमधून आलेल्या चार जणांच्या टोळीने हे धाडस केले.
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते, मात्र त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.
पंधरा दिवसांपूर्वीच बिलोलीत एटीएम फोडणाऱ्यांना अटक करण्यात आली होती, मात्र ही टोळी पोलिसांना जुमानत नसल्याचे चित्र आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांची चार पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना झाली आहेत.
६ लाख ७३ हजार रुपये लंपास
नांदेडमधून पळवलेले हे एटीएम मशीन हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा येथील एका शेतात आढळले. चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने किंवा इतर अवजारांनी मशीन फोडून त्यातील लाख ७३ हजार रुपये लंपास केले आणि मशीन तिथेच फेकून दिले. या प्रकरणावरून ही टोळी सराईत असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.