

There is a need to fight for irrigation now
भोकर, पुढारी वृत्तसेवा : भोकर तालुक्यातील सिंचनाची अवस्था अत्यंत वाईट असल्याने व याबाबत कोणी फारसं लक्ष देत नसल्याने आता जनसामान्यांना याबाबत पुढाकार घेऊन लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी सर्व पक्षीय जल सिंचन संघर्ष समिती गठीत करून समितीच्या वतीने लढा उभा करणे आवश्यक आहे.
भोकर तालुक्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. भोसी परिसरातील काही शेती, सात लघू तलाव व सुधा प्रकल्पावरून काही शेती सिंचनाखाली येत आहे. हे सिंचन अत्यंत अल्प आहे. या मुळे भोकर तालुक्यात सिंचन व्यवस्था वाढावी, यासाठी मागील वीस वर्षापासून प्रयत्न होत असले तरी यात यश मात्र आले नाही. यासाठी सर्वच पक्ष दुर्लक्ष करीत आहेत.
सुधा प्रकल्पाची उंची वाढल्यास व पिंपळढव नदीवर साठवण तलाव उभारल्यास २ हजार ८०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. या व्यतिरिक्त पाणी पातळीत वाढ होणार असल्याने आणखीन २ हजार हेक्टर शेतीला पाणी उपलब्ध होवू शकते. पण या कामाला तशी गती मिळत नसल्याने या प्रस्तावावर आता धुळ चडली आहे.
या व्यतिरिक्त पाकी तांडा येथील काळडोह येथे साठवण तलाव, दिवशी व जाकापूर येथील साठवण तलावाच्या फाईल ही पुढे सरकायला तयार नाहीत. या सिंचन व्यवस्थेच्या कामाकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष होत आहे. या मुळे तालुक्यातील शेती सिंचनापासून वंचित राहत आहे.
सिंचनाकडे होत असलेले दुर्लक्ष पाहाता शेतकरी या बाबत पुढाकार घेणे आवश्यक आहे. यासाठी सिंचन संघर्ष समिती गठीत करून याबाबत दिशा द्यावी लागणार आहे. सोबतच सरकार चे लक्ष खेचण्यासाठी अंदोलनाचा मार्ग ही अवलंबला लागणार आहे.
आपणच शांत निपचित पडलो तर पदरी काहीही पडणे शक्य नाही. मागील वीस वर्षापासून रखडलेल्या प्रकल्पासाठी सर्व पक्ष राजकीय मतभेद विसरून काम केले तरच तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी मदत होवू शकेल. नाहीतर हे काम लवकरच मार्गी लावू या आश्वासनवर समाधान मानावे लागणार आहे.
तालुक्यातील अनेक तलाव अर्धवट....
भोकर तालुक्यातील सोमठाणा, देवठाणा, कासरपेठ तांडा, कामनगाव, किनी यासह अनेक तलाव अर्धवट अवस्थेत आहेत. या तलावाच्या दुरुस्ती साठी मोठ्या प्रमाणात निधी ची आवश्यकता नाही. अल्प निधीतून हे तलाव दुरूस्त होतील आणि काही प्रमाणात शेतीला पाणी उपलब्ध होईल. यासाठी काम करणे आवश्यक आहे. पण, या कामाकडे दुर्लक्ष करून एकमेकांना पाण्यात पाहणे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांच्या काड्या करणे एवढाच एक कलमी कार्यक्रम सध्या भोकर तालुक्यातील राजकीय मंडळी करत असल्याने तालुक्याचा सिंचन सोबत सर्वांगीण विकासाला खोडा घातला जात आहे.