Nanded Drought : परतीच्या पावसाची हुलकावणी; रब्बी पिकांवर दुष्काळाचे सावट !

पेरणी अवघी २४ टक्के; नियोजित क्षेत्र गाठण्याबाबत साशंकता
Nanded Drought
Nanded Drought : परतीच्या पावसाची हुलकावणी; रब्बी पिकांवर दुष्काळाचे सावट !file photo
Published on: 
Updated on: 

The retreating monsoon failed to arrive; the shadow of drought looms over the Rabi crops!

किनवट, पुढारी वृत्तसेवा : खरिपातील नुकसानीनंतर रब्बी हंगामातून काहीशी भरपाई मिळेल, अशी आशा बाळगणाऱ्या किनवट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पदरी यंदा निराशाच पडण्याची चिन्हे आहेत. ऑक्टोबरमध्ये पावसाचा एक थेंबही न पडल्याने, परतीच्या पावसाची अपेक्षाही फोल ठरली. जमिनीतील ओल आटत असताना सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्याने, रब्बीच्या पेरणीला अपेक्षित गती मिळालेली नाही. तालुक्यात आतापर्यंत केवळ २४.४० टक्केच पेरणी झाली असून, हंगामावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे.

Nanded Drought
Latur Loan Recovery Staff Safety: कर्जवसुलीसाठी जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

तालुका कृषी कार्यालयाच्या साप्ताहिक अहवालानुसार, तालुक्यात रब्बी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र २४ हजार ३३०.८० हेक्टर आहे. गतवर्षी याच हंगामात ३२ हजार २२२.६० हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र आतापर्यंत अवघ्या ५ हजार ९३७.४० हेक्टरवरच पेरणी झाली आहे. यात ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र २,२७६.४० हेक्टर असताना केवळ ३१४ हेक्टरवर (१३.७९ टक्के) पेरणी झाली आहे.

गव्हाचे नियोजित क्षेत्र ४,७८४.८० हेक्टर असून सध्या १,८३९.२० हेक्टरवर (३८.४४ टक्के) पेरणी झालेली आहे. मक्याचे क्षेत्र ३,५३७.८० हेक्टर असताना केवळ ४२० हेक्टरवर (११.८७ टक्के) पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे नियोजित क्षेत्र १३,४५६ हेक्टर असून, आतापर्यंत केवळ ३,३६४.२० हेक्टरवर (२५ टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे. हंगामाच्या या टप्प्यावर ६० टक्क्यांहून अधिक पेरणी अपेक्षित असताना प्रत्यक्षात एक चतुर्थांश क्षेत्रही पेरले गेलेले नाही. किनवट तालुक्यात प्रामुख्याने हरभरा, त्यापाठोपाठ रब्बी ज्वारी, गहू, मका व करडई यांसारखी पिके घेतली जातात.

Nanded Drought
Autism : ऑटिझमग्रस्त मुलांमध्येही विशेष क्षमता; प्रेम, सन्मान अन् समान संधी द्या

मात्र, यंदा जमिनीत पुरेशी ओल नसल्याने आणि सिंचनासाठी पाणी

उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना पेरणीचा निर्णय घेणे कठीण झाले आहे. ज्या भागात थोडीफार सिंचनाची सोय आहे, तेथेच पेरणी सुरू आहे. केवळ पावसाच्या भरवशावर पेरणी केल्यास उगवण आणि पुढील वाढीची हमी नसल्याने शेतकरीही सावध भूमिका घेत आहेत.

दरम्यान, खरिपातील नुकसानीनंतर रब्बीच्या उत्पन्नावर घरखर्च, कर्जाची परतफेड आणि पुढील हंगामाचे नियोजन अवलंबून असते. मात्र, पेरणीसाठी पोषक स्थिती नसल्याने यंदा नियोजित क्षेत्र गाठणे कठीण होण्याची चिन्हे आहेत. उर्वरित कालावधीत सरासरी ६० ते ७० टक्के पेरणी तरी होईल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. यावर्षी तालुक्यातील रब्बीचे क्षेत्र घटल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढू शकतात.

कमी पाण्याच्या पिकांना प्राधान्य द्या.....

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जमिनीतील ओल आणि सिंचनाच्या मर्यादित पाण्याचा विचार करून कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे. रब्बी ज्वारी, हरभरा आणि करडई ही तुलनेने कमी पाण्यात येणारी पिके चांगला पर्याय ठरू शकतात. मात्र, जमिनीत पुरेशी ओल नसल्यास या पिकांची उगवणही अडचणीची ठरू शकते. त्यामुळे पेरणीपूर्वी जमिनीतील ओल, उपलब्ध पाणी आणि पिकांची पाण्याची गरज यांचा विचार करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.