

The responsibility of the Chairperson of the Shri Renukadevi Sansthan now rests with the Joint Charity Commissioner
श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा : श्री रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता नांदेडच्या सहधर्मदाय आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिसूचना राज्य शासनाच्या २९ मे रोजी प्रकाशित झालेल्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यापूर्वी २०१४ पासून श्री रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी जिल्हा व सत्र न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांकडे होती. मात्र, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० मध्ये सप्टेंबर २०२५ पासून करण्यात आलेल्या सुधारणांनुसार नवीन कलम ५० (बी) च्या अनुषंगाने राज्यातील दिवाणी अथवा जिल्हा न्यायालयांच्या नियंत्रणाखालील व्यवस्थापनातील देवस्थानांच्या न्यायालयीन प्रतिनिधित्व रद्द करण्यात आले आहे. या बदलानुसार संबंधित देवस्थानांच्या विश्वस्त मंडळांमध्ये न्यायाधीशांच्या जागी धर्मदाय विभागातील सहायक धर्मदाय आयुक्त किंवा सहधर्मदाय आयुक्त यांना अधिकार देण्यात आले आहेत.
परिणामी, श्री रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही आता सहधर्मदाय आयुक्तांकडे आली आहे. तसेच संस्थानच्या विश्वस्त मंडळातील पुढील नियुक्त्यांचे अधिकारही सहधर्मदाय आयुक्तांकडेच राहणार आहेत.