

The lotus bloomed in Mudkhed Municipality after 25 years.
विशेष प्रतिनिधी
नांदेड : राजकारणातील 'चक्र' कधी उलटे कसे फिरते, याचे ठळक उदाहरण जिल्ह्यातील मुदखेड नगर परिषदेत बघायला मिळाले आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी ज्या अशोक चव्हाण यांनी या पालिकेतील भाजपाची दीर्घकालीन सत्ता संपुष्टात आणली, त्या चव्हाण यांच्या माध्यमातूनच भाजपाने या पालिकेत आपली सत्ता पुनःस्थापित केली आहे.
जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीत काही ठिकाणी अपेक्षित तर काही ठिकाणी अनपेक्षित तसेच धक्कादायक निकालांची नोंद होत असताना मुदखेडमधून वेगळे चित्र समोर आले. १९८० साली भाजपाची स्थापना झाल्यानंतर या पक्षाला राज्यातील तेव्हाच्या नगरपरिषदांपैकी मुदखेड नगर परिषदेत पहिल्यांदा संपूर्ण बहुमतासह सत्ता मिळाली होती आणि तेव्हा तरुण असलेल्या राम चौधरी यांच्या नावावर भाजपाचे कायर्यालय नगर परिषद मुदखेड जि. नांदेड राज्यातील पहिले नगराध्यक्ष अशी नोंद झाली. स्थानिक पातळीवरचा प्रभाव आणि राजकीय कौशल्याच्या बळावर त्यांनी १५ वर्षे नगराध्यक्षपद भूषविले.
मुदखेड विधानसभा मतदारसंघात १९९९ साली काँग्रेस पक्षातून 'अशोक पर्व' सुरू झाले. त्यानंतर झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून भाजपा आणि राम चौधरी यांची सत्ता उलथवून लावली होती. नंतर त्यांनी काही काळ चौधरी यांना काँग्रेस पक्षात येण्यास भाग पाडले. कालांतराने चौधरी यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीच्या माध्यमातून पालिकेत या पक्षाची सत्ता आणण्याचा प्रयत्न केला; पण तेव्हाही चव्हाण यांनी त्यांचे प्रयत्न उधळून लावले.
दीर्घकालीन प्रशासकीय राजवटीनंतर नगरपालिकांच्या निवडणुकांना मुहूर्त लागल्यानंतर नांदेड जिल्ह्यात भाजपाचे नेतृत्व करणाऱ्या चव्हाण यांच्यावर भोकर आणि मुदखेड या दोन्ही ठिकाणी भाजपाची सत्ता आणण्याची जबाबदारी येऊन पडली. भोकरमध्ये त्यांनी आपल्या जुन्या पक्षाचा धुव्वा उडवताना नगराध्यक्षपदासह पालिकेत भाजपाला बहुमताने निवडून आणले.
मुदखेडमध्ये मात्र खुद्द राम चौधरी यांनी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपला अनुभव आणि प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे तेथील निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते; परंतु या राजकीय लढाईमध्ये शेवटी चव्हाण यांची सरशी झाली. भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विश्रांती कदम यांच्यासह भाजपाचे १४ नगर-सेवक निवडून आले. तर काँग्रेसची चार जागांवर घसरण झाली.