

The issue regarding the site for the Kandhar court will soon be resolved!
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : कंधार न्यायालयाच्या जागेसाठी वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप जागा उपलब्ध झाली नसल्यामुळे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी २६ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या दालनात संबंधित विभाग प्रमुखांशी बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे आता न्यायालयासाठी जागा लवकरच उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
न्यायालयासाठी जागा उपलब्ध नसल्याच्या बाबीची दखल घेत आ. प्रताप पाटील चिखलीकर यांनी बुधवारी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली कंधार न्यायालयाच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात संबंधित जागेसाठी विभाग प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत जागे संबंधी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामुळे कंधार न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या जागेचा प्रश्न लवकरच निकाली निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या बैठकीला उपजिल्हाधिकारी अजय शिंदे, कंधारचे उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पेरके, कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे, मुख्याधिकारी संदीप भोळे, भूमि अभिलेखचे उपअधीक्षक बळवंत नरोटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सचिन ऐतलवाड, अभिवक्ता संघाचे अध्यक्ष अॅड. बी. के. पांचाळ, जि.प.चे उपअभियंता बसवदे, संघाचे माजी अध्यक्ष अॅड. दिगंबर गायकवाड, नायब तहसीदार मुदिराज, शाखा अभियंता चमकुरे, मंडळाधिकारी सौ. निवडंगे, तलाठी देशमुख आदी उपस्थित होते.