

TET exam peaceful; 1542 absent
नांदेड, पुढारी वृत्तसेवा : बहुचर्चित शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी शहरातील वेगवेगळ्या ८५ केंद्रावर दोन सत्रात पार पडली. विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडविणाऱ्या शिक्षकांना ही परीक्षा देताना घाम फुटत होता. गुरूजनांनी या परीक्षेची मागील अनेक दिवसांपासून तयारी चालवली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. हा निर्णय जेव्हा झाला तेव्हा राज्यभरातील शिक्षकांनी त्यास विरोध केला होता. राज्य शासनाने सुद्धा शिक्षकांची बाजू घेत न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. परंतु अखेर रविवारी परीक्षा घेतली गेली. विविध विषयांवर आधारीत प्रश्नपत्रिका सोडविताना शिक्षकांची तारांबळ उडाली.
जो विषय ज्या शिक्षकाचा आहे, त्या विषयावरील प्रश्न सोडविणे शिक्षकांना सोपे गेले परंतु अनेक वर्षांपासून ज्या विषयांचा प्रत्यक्ष संबंध आला नाही. तिथे मात्र शिक्षकांना घाम फुटला. गणिताच्या शिक्षकाला विज्ञानाचे प्रश्न सोडविता आले नाहीत तर विज्ञानाच्या शिक्षकाला इतिहासाचे प्रश्न सोडविताना नाकीनऊ आले, असे परीक्षेनंतर अनेक शिक्षकांनी सांगितले.
शिक्षक पात्रता परीक्षेच्या पहिला सत्रात ११ हजार नोंदणीकृत शिक्षकांपैकी ६५५ गैरहजर होते तर दुस-या सत्रात १४९७४ नोंदणीपैकी १४ हजार ९० जणांनी परीक्षा दिली. ८८४ परीक्षार्थी शिक्षकांनी परीक्षेला दांडी मारली.
आता निकालाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून परीक्षा दिलेल्या हजारो शिक्षकांपैकी किती जण उत्तीर्ण होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अनुत्तीर्ण शिक्षकांच्या नोकरीला धोका नसलातरीही सन्मानाचा प्रश्न आहे. आदेशानुसार अनुत्तीर्ण शिक्षकांना स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागणार आहे पण शेवटी निर्णय काय होतो हे निकालाअंतीच स्पष्ट होईल.