

TET confusion continues, application deadline extended
नांदेड, पुढारी वृत्तसेवा शिक्षक पात्रता परीक्षा द्यावीच लागेल, अशी मानसिक तयारी शिक्षक बांधवांची झाली असली तरी शिक्षण राज्यमंत्र्यांच्या ताज्या आश्वासनानंतर या लचांडातून सुटका होण्याची आशा पल्लवित झाली आहे. त्यामुळे दि. ४ ऑक्टोबरचे नियोजित आंदोलन होणार की नाही, याबाबत शिक्षकांत संभ्रम आहे. दरम्यान, टी.ई.टी. साठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत दि. १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर होती. त्यात आता अतिवृष्टीचे कारण देत ९ तारखेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. ३) हे पत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निर्गमित केले.
२०१३ पूर्वी शासन सेवेत शिक्षक म्हणून रुजू झालेल्या आणि वयाची ५२ वर्ष पूर्ण न केलेल्या शिक्षकांसाठी टी.ई.टी. अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानेच तसा निर्णय दिला असल्याने देशभरातील शिक्षकांना ती द्यावी लागणार आहे. यासाठी दोन संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पहिली संधी दि. २३ नोव्हेंबर ही असेल. दोन्ही संधीत अपात्र ठरलेल्या शिक्षकांना ऐच्छिक सेवानिवृत्ती हा पर्याय ठेवण्यात आला आहे. अर्थात शिक्षक बांधवांचे आर्थिक दृष्ट्या नुकसान होणार नसले तरी सामाजिक इभ्रतीवर मात्र प्रश्नचिन्ह लागणार, त्याला मात्र शिक्षकांना तोंड द्यावे लागणार आहे.
इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गावर नियुक्त असलेल्या ५२ वर्षाच्या आतील सर्व शिक्षकांना सर्वोच्च न्यायालयाच्या दि. १ सप्टेंबरच्या आदेशानुसार दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. वर्षातून एकदाच टीईटी होत असल्याने आता दि. २३ नोव्हेंबरला होणारी टीईटी या शिक्षकांसाठी पहिली संधी असणार आहे. ऑक्टोबर मध्ये दिवाळी असून साधारण ८ ते १० दिवसांच्या सुट्ट्या असतील. परंतु टी.ई.टी.च्या टेन्शनमुळे शिक्षकांची दिवाळी व दिवाळसण टीईटीचा अभ्यास करण्यात जाणार आहे. तूर्त शिक्षक बांधव ऑफलाईन द्यावी लागणाऱ्या टी.ई.टी.चा ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्यात गुंतले आहेत.
अर्ज दाखल करण्याची मुदत १५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या दरम्यान होती. परंतु अलिकडे राज्यभरात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती यामुळे त्यात वाढ करण्यात आली असून आता दि. ९ ऑक्टोबरच्या रात्री ११.५९ पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. दरम्यान, वेळोवेळी शिक्षकांवरच प्रयोग का, अशी प्रश्नार्थक भावना या वर्गात पसरली आहे. इंजिनिअर्स, डॉक्टर्स तसेच अन्य क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पात्रता का तपासली जात नाही, असा प्रश्न दबक्या आवाजात शिक्षक बांधव विचारताना दिसतात.
नागपुरातील रविभवनात नुकत्याच झालेल्या बैठकीला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्रप्रताप सिंह, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोोसावी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग नोंदवला. याशिवाय महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, एकनाथ स्वाभीमानी शिक्षक संघटना, विदर्भप्राथमिक माध्यमिक शिक्षक संघ, शिक्षक भारती संघटना, खाजगी शाळा शिक्षक संघ, अंजुमन इशाद ए तालीब संस्था व अखिल भारतीय ऊर्द शिक्षक संघ या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, शिक्षकांनी आता टीईटी देण्याची मानसिकता बनवून परीक्षेची तयारी देखील सुरू केली होती. परंतु राज्य शासनाच्या भूमिकेमुळे त्यात बरीचशी शिथिलता आली आहे. जाहीर केलेले आंदोलनसुद्धा स्थगित करण्यात आले आहे. परंतु दि. ३ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे पत्र जारी झाले असून त्यामुळे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत वाढविल्यामुळे पुन्हा संभ्रम वाढला आहे. हे लचांड सुटणार नाही, असे गृहित धरून बहुसंख्य शिक्षकांनी अभ्यासाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळी सुट्टी टीईटीच्या अभ्यासात जाईल, अशी स्थिती आहे.