

Nanded Crime News : Inter-district burglary gang busted, 8 crimes exposed
नांदेड, पुढारी वृत्तसेवा नांदेड जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभरोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण ८ गुन्हे उघडकीस आणून ४ लाख ५८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नायगाव व कुंटूर परिसरात झालेल्या घरफोडीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक नेमण्यात आले होते. ११ जुलै २०२६ रोजी सी.सी.टी. व्ही. फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सांगवी टी-पॉईंट येथून शंकर उर्फ सोनू पिराजी पवार (वय २५, रा. वसमत, जि. हिंगोली) आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे साथीदार राहुल गुंडाळे, लखन मारखुळे, बाबा ऊर्फ बाळू पवार (सर्व रा. वसमत) आणि अमोल चव्हाण (रा. सांगवी, नांदेड) यांच्या मदतीने नायगाव, कुंटूर, मुदखेड, पालम, पिंपळदरी (जि. परभणी), जालना व मुंबई परिसरात चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींनी किराणा, मोबाईल दुकाने आणि ग्राहक सेवा केंद्रांचे शटर उचकटून रोख रक्कम चोरली होती. तसेच विविध ठिकाणांहून तीन मोटारसायकली लांबवल्या होत्या. पोलिसांनी माळटेकडी परिसरातील एका बंद घराजवळ लपवलेली वाहने जप्त केली.
एकूण मुद्देमाल: ₹४,५८,५००/- (रोख १८,५०० रुपये, एक पल्सर, एक अपाची आणि मुंबईतून चोरलेली एक बुलेट मोटारसायकल). उघडकीस आलेले गुन्हेः नायगाव, कुंटूर, मुदखेड, पालम (परभणी), पिंपळदरी, जालना आणि मुंबई येथील एकूण ८ गुन्हे उघड झाले. मुख्य आरोपी शंकर पवार हा धर्माबाद पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातही पाहिजे होता.
सध्या दोन्ही मुख्य आरोपींना पुढील कारवाईसाठी नायगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांचे उर्वरित ४ फरार साथीदार अद्याप गायब आहेत. ही धडक कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले, उपनिरीक्षक तुकडे आणि अंमलदार दारासिंग राठोड, मोहन हाक्के, शिलराज ढवळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.