

परभणी : अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात रविवारी (दि.८) ‘मासरेड’ मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेंतर्गत नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या चारही जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कारवाया करण्यात आल्या.
या कारवाईत एकूण २५५ गुन्हे नोंद करण्यात आले असून तब्बल ७ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये हातभट्टी दारू, देशी व विदेशी दारू, तसेच तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन यांचा समावेश होता. या कारवाईत १६१ अधिकारी व ६९९ अंमलदार सहभागी झाले होते. स्थानिक गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली गेली.
पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेने अवैध दारू विक्रेत्यांवर मोठा आळा घातला आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, अवैध दारू विक्रीविषयी माहिती तातडीने पोलिसांना द्यावी जेणेकरून असे प्रकार रोखता येतील. सदर मोहीम नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, परभणीचे रविंद्रसिंह परदेशी, हिंगोलीचे श्रीकृष्ण कोकाटे व लातूरचे सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत संबंधित जिल्ह्यांचे अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, निरीक्षक, उपनिरीक्षक, अंमलदार आणि स्थानिक गुन्हे शाखांचे अधिकारी सहभागी होते.