100th Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ.लिंबाळे यांचे नाव आघाडीवर?

साहित्य महामंडळाची आज पुण्यामध्ये बैठक
100th Marathi Sahitya Sammelan
प्रा.डॉ.शरणकुमार लिंबाळे pudhari photo
Published on: 
Updated on: 

संजीव कुळकर्णी

नांदेड : पुढील वर्षी पुण्यात भरणार्‍या शंभराव्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड मंगळवारी पुण्यामध्येच होणार्‍या साहित्य महामंडळाच्या बैठकीत केली जाणार असून या पदासाठी दलित साहित्यात लक्षणीय योगदान देणारे ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ.शरणकुमार लिंबाळे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

साहित्य महामंडळाच्या महाराष्ट्रातील चार घटक संस्था व बृहन्महाराष्ट्रातील संलग्न संस्थांचे प्रतिनिधी तसेच माजी संमेलनाध्यक्ष एकोणवीस सदस्यांकडून वरील ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. या बैठकीसाठी मराठवाडा साहित्य परिषदेचे तीन प्रतिनिधी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांतील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार लिंबाळे यांच्यासाठी संमेलनाच्या आयोजनातील प्रमुखांनी जोरदार 'लॉबिंग' सुरू केले आहे. स्वतः लिंबाळे यांनीही महामंडळाच्या बहुतांश सदस्यांशी संपर्क साधून आपल्या नावाला पाठिंबा देण्याची विनंती केल्याचे सांगण्यात आले.

100th Marathi Sahitya Sammelan
Marathwada Water Crisis : वाहने धुण्यासाठी मराठवाड्यात रोज २.२० कोटी लिटर पाण्याची नासाडी

अध्यक्षपदासाठी लिंबाळे तसेच छत्रपती संभाजीनगरातील लेखक-प्रकाशक बाबा भांड यांचेही नाव महामंडळासमोर दाखल झाले असले, तरी तीन घटक संस्थांच्या प्रतिनिधींनी लिंबाळे यांचे नाव उचलून धरले असल्याची माहितीही समोर आली. भांड यांच्या नावासाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या प्रतिनिधींनी आग्रह धरला असला, तरी भाजपा व संघ परिवारातील प्रमुखांचा कल लिंबाळे यांच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे.

शरणकुमार लिंबाळे यांची लेखन कारकीर्द 'अक्करमाशी' या आत्मकथनाने सुरू झाली. वयाच्या १९व्या वर्षीच प्रसिद्ध झालेल्या या आत्मकथनाला मराठी साहित्य विश्वात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. नंतरच्या ५० वर्षांत लिंबाळे यांची चाळीसहून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांतील दलित साहित्य आणि सौंदर्य, दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र, शतकातील दलित विचार आदी पुस्तकांनी दलित साहित्यात मोलाची भर घातल्याचे मानले जाते. दलित साहित्य आणि अमेरिकन निग्रो साहित्य हा त्यांच्या पी.एचडी.चा विषय होता. शंभराव्या संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांना विराजमान करून राज्यातील एका सत्ताधारी पक्षाकडून वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न होत आहे.

100th Marathi Sahitya Sammelan
Latur Crime : पोलिस ठाण्यातच युवकाने जीवन संपवले

डॉ. लिंबाळे यांचा प्रवास

डॉ.लिंबाळे यांनी वयाची सत्तरी गाठली आहे. सुमारे ५० वर्षांच्या लेखन प्रवासात त्यांनी सातत्य राखले. अनेक मान-सन्मान त्यांना प्राप्त झाले. मराठी साहित्यात एम.ए. आणि नंतर पी.एचडी. प्राप्त केल्यानंतर त्यांनी दीर्घकाळ नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्राध्यापक व संचालकपद सांभाळले; पण त्यांच्या नोकरीची सुरुवात दूरसंचार विभागात टेलिफोन ऑपरेटर या पदापासून सुरू झाली. अक्करमाशी प्रकाशित झाल्यानंतर काही वर्षे त्यांनी आकाशवाणीमध्येही उद्घोषकाची सेवा बजावली. बिरला फाऊंडेशनच्या सरस्वती पुरस्कारासह अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.