

नांदेड ः बँकेतील सुरक्षितता आणि विश्वासार्हतेला कळी लावणारी एक अत्यंत धक्कादायक घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. ग्राहकांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या जागी बनावट सोने ठेवून तब्बल 85 लाख 81 हजार 597 रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी बँकेच्याच दोन जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एकाला अटक केली व त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तर एकजण फरार झाला आहे.
बँकेचे मुख्य व्यवस्थापक राजीव अनंत कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. आदित्य प्रकाश सेनगावकर (वय 40, रोकड व्यवस्थापक) व जीवन माधवराव जगदाळे (वय 39, सेवा व्यवस्थापक) अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
नांदेडच्या डॉक्टर लेन परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. या शाखेत आठ ग्राहकांनी आपले 805.90 ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेतले होते. हे सोने बँकेच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी रोकड व्यवस्थापक सेनगावकर आणि सेवा व्यवस्थापक जगदाळे यांच्यावर होती. परंतु, या दोघांनी संगनमत करून 27 जून 2025 ते 11 मे 2026 या कालावधीत मूळ सोन्यापैकी 391.60 ग्रॅम खरे सोने काढून घेतले. बँकेची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी त्या जागी 414.30 ग्रॅम वजनाचे बनावट सोने आणून ठेवले.
बँकेच्या अंतर्गत तपासणी आणि शहानिशेदरम्यान सोन्याच्या दागिन्यांमध्ये फेरफार झाल्याचे व्यवस्थापनाच्या लक्षात आले. खऱ्या सोन्याच्या जागी बनावट दागिने असल्याचे उघड होताच बँकेत एकच खळबळ उडाली. मुख्य व्यवस्थापकांनी तातडीने पोलिसांत तक्रार दिली. वजिराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल करून जिवन जगदाळे याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले व त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तर सेनगावकर फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम करत आहेत. पोलीस कोठडीदरम्यान या गुन्ह्यामागील संपूर्ण रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कुंपनच शेत ....
सर्वसामान्य नागरिक बँकांमध्ये आपले पैसे आणि सोने सर्वात सुरक्षित राहील या विश्वासाने ठेवतात. त्यातच स्टेट बँक ही मोठी बँक असल्याने ग्राहकांचा त्यावर मोठा विश्वास असतो. मात्र, चांगला पगार आणि जबाबदार पद असतानाही बँकेच्याच मुख्य अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या विश्वासाला तडा दिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तपासाचे मुख्य मुद्दे :
बनावट सोने आले कुठून? : आरोपी अधिकाऱ्यांनी हुबेहूब दिसणारे बनावट दागिने कोणाकडून बनवून घेतले?
खरे सोने कुठे गेले? : लॉकरमधून चोरलेले खरे सोने त्यांनी बाजारात विकले की त्याचे काय केले?
मास्टरमाईंड कोण? : या संपूर्ण कटामध्ये या दोघांशिवाय बँकेतील किंवा बँकेबाहेरील इतर कोणाचा सहभाग आहे का?