

₹7.31 Crore Embezzlement at Canara Bank, Badnapur; Two Arrested, One Absconding
बदनापूर : पुढारी वृत्तसेवा बदनापूर येथील कॅनरा बँक शाखेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून तसेच बनावट सोने तारण ठेवून बँकेची तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे.
या संदर्भात बँकेचे सहायक महाव्यवस्थापक केशवमूर्ती बी. व्हो. यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार बँकेचे अधिकारी, शाखा व्यवस्थापक आणि सुवर्ण मूल्यमापक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपशील :
सुवर्ण कर्ज पाकिटांच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान २२ एप्रिल २०२६ रोजी हा घोटाळा उघडकीस आला. तपासणीदरम्यान काही पाकिटांमध्ये बनावट सोने आढळल्याने सखोल चौकशी करण्यात आली.
मुख्य निष्कर्ष :
एकूण २२ सुवर्ण कर्ज पाकिटांमध्ये बनावट सोने आढळून आले (किंमत सुमारे ३.७९ कोटी रुपये) स्ट्राँग रूममधून ३० सोन्याची पाकिटे गायब (किंमत सुमारे ३.५२ कोटी रुपये)
सीसीटीव्ही पुरावा : २३ एप्रिल रोजी सकाळी ११:२० वाजण्याच्या सुमारास बँकेचे अधिकारी संजय डोंगरे हे स्ट्राँग रूममधून सोन्याची पाकिटे चोरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
संशयित आरोपींची भूमिका :
संजय डोंगरे (बँक अधिकारी) प्रत्यक्ष चोरी केल्याचा आरोप
विजेंद्र पाटणकर (शाखा व्यवस्थापक) सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन व कर्तव्यात कसूर
प्रवीण बुन्हाडे (सुवर्ण मूल्यमापक) बनावट सोन्याला खरे असल्याचे प्रमाणित करून फसवणुकीत सहभाग
या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील कारवाई :
या प्रकरणात विजेंद्र पाटणकर व प्रवीण बुन्हाडे यांना अटक करण्यात आली असून संजय डोंगरे हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे हे करत असून या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा देखील शोध पोलिसांकडून सुरू आहे.